"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 04:43 PM2024-05-04T16:43:34+5:302024-05-04T17:08:24+5:30
Lok Sabha Elections 2024 IP Singh And Narendra Modi : समाजवादी पक्षाच्या नेत्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाच्या नेत्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. सपा नेते आयपी सिंह म्हणाले की, "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. याबाबत आघाडीने गांभीर्याने विचार करावा."
सपा नेते आयपी सिंह यांनी दावा केला की, त्यांनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात इंडिया आघाडीकडून तीन नावं सुचवली आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल किंवा आप खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवावी. निवडणूक लढवल्याने वाराणसीत आघाडीची दावेदारी बळकट होईल असं म्हटलं आहे.
बनारस लोकसभा से दिल्ली के कट्टकर ईमानदार मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल को चुनाव लड़ना होगा।
— I.P. Singh (@IPSinghSp) May 4, 2024
या उनकी धर्मपत्नी IAS रहीं श्रीमती सुनीता केजरीवाल जी को प्रधानमंत्री/भाजपा के खिलाफ महिला उत्पीड़न को लेकर नामांकन दाखिल करें।
या आम आदमी के मजबूत स्तम्भ श्री संजय सिंह लड़ें और…
आयपी सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दिल्लीचे कट्टर प्रामाणिक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल. किंवा त्यांची पत्नी, सुनीता केजरीवाल यांनी पंतप्रधान/भाजपाविरुद्ध नामांकन दाखल करावं. किंवा सर्वसामान्यांचे भक्कम आधारस्तंभ संजय सिंह यांनी निवडणूक लढवावी आणि उमेदवारी अर्ज दाखल करावा. इंडिया आघाडीने याचा गांभीर्याने विचार करावा" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आयपी सिंह यांनी यापैकी कोणीही वाराणसीतून निवडणूक लढवल्यास भाजपाचा पराभव होईल. एवढंच नाही तर केंद्रात सरकारही स्थापन करता येईल असं म्हटलं आहे. इंडिया आघाडीत वाराणसी लोकसभा जागा काँग्रेसकडे गेली आहे. या जागेवरून काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना तिकीट दिलं आहे. या जागेवर बसपाकडून मुस्लिम उमेदवार अतहर जमाल लारी निवडणूक लढवत आहेत.
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी 2014 मध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते दुसऱ्या स्थानावर राहिले आणि त्यांना 2,09,238 मतं मिळाली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. या निवडणुकीत नरेंद्र मोदींना 5,81,022 मतं मिळाली. काँग्रेसचे अजय राय तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना केवळ 75,614 मतं मिळाली.