Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 05:13 PM2024-05-09T17:13:03+5:302024-05-09T17:13:12+5:30
Yusuf Pathan : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाण लोकसभेच्या रिंगणात आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युसूफ पठाण लोकसभेच्या रिंगणात आहे. तो पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावत आहे. काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात नामांकित चेहरा देऊन तृणमूल काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. युसूफच्या प्रचारासाठी त्याचा भाऊ इरफान पठाण मैदानात उतरला आहे. त्याने आपल्या भावाच्या विजयासाठी रॅली काढत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले.
जेव्हा कुणी क्रिकेटर अथवा कलाकार निवडणुकीच्या मैदानात उतरतो तेव्हा त्याचा वेगळा प्रभाव असतो. युसूफ पठाण क्रिकेटमधील प्रसिद्ध नाव आहे परंतु त्याच्यासमोर अधीर रंजन चौधरी यांचे तगडे आव्हान आहे. बहरामपूरमधील जातीय समीकरण पाहता युसूफ विजयी होण्याची शक्यता टीएमसीला वाटते. जर मुस्लीम मतदारांनी एकगठ्ठा मतदान युसूफच्या पारड्यात टाकले तर अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे कठीण होईल. त्यातून युसूफ पठाणच्या विजयाचा मार्ग सुकर होईल. भाजपाने या जागेवर डॉ. निर्मलकुमार साहा यांना मैदानात उतरवले आहे.
भावासाठी भाऊ मैदानात!
#WATCH बहरामपुर, मुर्शिदाबाद: बहरामपुर लोकसभा सीट से TMC उम्मीदवार यूसुफ पठान और उनके भाई व पूर्व भारतीय क्रिकेटर इरफान पठान ने रोड शो किया।#LokSabhaElection2024pic.twitter.com/TZFQZshj9o
— ANI_HindiNews (@AHindinews) May 9, 2024
जर आपण विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केले तर, बहरामपूरमधील सात विधानसभा जागांपैकी सहा जागा टीएमसीकडे आहेत, तर एक जागा भाजपकडे आहे. त्यामुळे लोकसभेसाठी टीएमसीने नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे. मूळचा गुजरातचा असलेला युसूफ पठाण फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. पण, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांचे आभार मानले.
बहरामपूर मतदारसंघातील जातीय समीकरण
बहरामपूर लोकसभा मतदारसंघात हिंदू आणि मुस्लीम, दोन्ही समुदायातील लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. २०१९ ची निवडणूक पाहिली तर या जागेवर १६ लाख ३२ हजार ८७ मतदार होते. त्यातील मुस्लीम मतदारांची संख्या तब्बल ८ लाख ४८ हजार इतकी होती. म्हणजे ५२ टक्के मतदार हे मुस्लीम समुदायातील होते. तर बहरामपूर लोकसभा जागेवर १३ टक्के एससी, १ टक्के एसटी मतदारही आहेत.