इलेक्शन काळात जप्त केलेल्या पैशांचं आणि दारूचं निवडणूक आयोग नेमकं करतं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 03:50 PM2024-03-20T15:50:00+5:302024-03-20T15:56:44+5:30

सर्वच राजकीय पक्षांची तयारीही जोरात सुरू झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळात दररोज कोट्यवधी रुपयांची रोकड वसूल केली जाते.

Lok Sabha Elections 2024 what does election commission do with money liquor seized during elections | इलेक्शन काळात जप्त केलेल्या पैशांचं आणि दारूचं निवडणूक आयोग नेमकं करतं काय?

इलेक्शन काळात जप्त केलेल्या पैशांचं आणि दारूचं निवडणूक आयोग नेमकं करतं काय?

देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच देशात आचारसंहिता लागू होते. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांची तयारीही जोरात सुरू झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळात दररोज कोट्यवधी रुपयांची रोकड वसूल केली जाते. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, बेकायदेशीरपणे किंवा निवडणुकीदरम्यान नियमांविरुद्ध वापरलेली रोकड आणि दारू पोलिसांकडून जप्त केली जाते. निवडणुकीच्या काळात या कोट्यवधी रुपयांचे आणि जप्त केलेल्या दारूचं काय होतं आणि कुठे जाते? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याबाबत जाणून घेऊया....

काळ्या पैशाचा सर्वाधिक वापर निवडणुकांमध्ये होतो. बहुतेक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी पट जास्त खर्च करतात. निवडणुकीच्या कामात काळा पैसा वापरला जातो ज्याचा कोणताही हिशोब दिला जात नाही. त्यामुळे विविध ठिकाणांहून पक्ष आणि उमेदवारांना मोठ्या प्रमाणात रोकड पोहोचवली जाते. यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. ते संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची आणि लोकांची तपासणी आणि चौकशी करत असतात. याशिवाय पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून किंवा माहिती देणाऱ्यांकडूनही माहिती मिळते. मग ते छापा टाकून रोकड किंवा दारू जप्त करतात.

निवडणुकीच्या काळात पोलिसांकडून जी काही रोकड जप्त केली जाते ती आयकर विभागाकडे सोपवली जाते. पोलीस ज्या व्यक्तीकडून रोख रक्कम गोळा करतात ती नंतर त्यावर दावा करू शकते. हा पैसा स्वतःचा आहे आणि तो बेकायदेशीरपणे कमावला गेला नाही हे सिद्ध करण्यात ती व्यक्ती यशस्वी झाली आणि जर त्याने पुरावा म्हणून संपूर्ण माहिती सादर केली तर त्याला पैसे परत केले जातात. पुराव्यासाठी, तुमच्याकडे एटीएम व्यवहार, बँकेची पावती आणि पासबुकमधील नोंद असणे आवश्यक आहे. जप्त केलेल्या रकमेवर कोणी दावा केला नाही तर तो पैसा सरकारी तिजोरीत जमा होतो.

निवडणुकीच्या काळात रोख रकमेशिवाय मोठ्या प्रमाणात दारूही जप्त केली जाते. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारूचा वापर केला जातो. या दारूची कायदेशीर वाहतूक होत असेल तर कारवाई केली जात नाही. मात्र कागदपत्रांशिवाय वाहतूक केल्यास ती दारू जप्त केली जाते. निवडणुकीदरम्यान सापडलेली सर्व दारू प्रथम एकाच ठिकाणी जमा केली जाते. नंतर ती एकत्रच नष्ट केली जाते. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Lok Sabha Elections 2024 what does election commission do with money liquor seized during elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.