लोकसभा इलेक्शन सुरु, विधानसभा तोंडावर; आप मोठ्या संकटात, केजरीवाल अडकले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:03 AM2024-03-22T10:03:38+5:302024-03-22T10:04:05+5:30
Arvind Kejriwal ED arrest Update: केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. ईडीच्या मुख्यालयातच केजरीवाल यांनी रात्र घालविली आहे.
कथित दिल्ली अबकारी घोटाळ्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अखेर अटक केली आहे. यामुळे आज दिल्लीत आप आंदोलन करणार आहे. केजरीवाल यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. ईडीच्या मुख्यालयातच केजरीवाल यांनी रात्र घालविली आहे. केजरीवाल यांना अटक झाल्याने आपसमोर ऐन लोकसभा निवडणुकीत मोठे संकट उभे ठाकले आहे.
ईडीने केजरीवालांना ९ नोटीस पाठविल्या होत्या. परंतु केजरीवाल एकदाही चौकशीला सामोरे गेले नव्हते. अटक केली तर लोकसभा निवडणुकीत प्रचार कसा करणार असा मोठा प्रश्न आपसमोर होता. अखेर तेच घडले आहे. केजरीवाल यांना पीएमएलए कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. या कायद्यात सहजासहजी सुटका होत नाही. यामुळे केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही तर इतक्यात काही त्यांची सुटका होणे शक्य नाही.
केजरीवाल यांचा आप लोकसभेच्या २३ जागा लढवत आहे. यामुळे याठिकाणी केजरीवाल प्रचाराला गेले नाहीत, तर बऱ्याच ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे. कारण आपकडे तोडीचा नेता नाही. तसेच दिल्ली विधानसभा निवडणूकही पुढील वर्षी फेब्रुवारीत होणार आहे. लोकसभा निवडणूक सुरु असताना तसेच विधानसभा निवडणूक तोंडावर असताना केजरीवाल यांना अटक झाल्याने आपसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
केजरीवालांच्या अनुपस्थितीतच आपला निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीची तयारीही आपने केली होती. तिथेही याचा फटका बसणार आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना गेल्या एक वर्षापासून जामिन मिळालेला नाही. यामुळे केजरीवाल यांना लोकसभेसह विधानसभा निवडणुकीतही प्रचारापासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. असे झाले तर विधानसभेमध्येही आपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.