लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचा मास्टरस्ट्रोक, 'या' राज्यातील सर्वात मोठ्या पक्षासोबत करणार युती?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 06:20 PM2024-03-06T18:20:17+5:302024-03-06T18:52:40+5:30
Lok Sabha Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपा जास्त जागा लढवेल, तर बीजेडी विधानसभेच्या जास्त जागा लढवेल, असे धोरण आखले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Lok Sabha Elections 2024 : नवी दिल्ली : देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने (भाजपा) मास्टरस्ट्रोक खेळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा ओडिशातील सत्ताधारी पक्ष बिजू जनता दल (बीजेडी) सोबत युती करू शकतो. ओडिशात भाजपा आणि बीजेडीची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. याबाबत पुढील दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.
भाजपा आणि बीजेडीमधील युतीबाबत लवकरच घोषणा होऊ शकते. राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपा जास्त जागा लढवेल, तर बीजेडी विधानसभेच्या जास्त जागा लढवेल, असे धोरण आखले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, लोकसभा निवडणुकीत भाजपा १३ ते १४ जागा लढवेल आणि बीजेडी ७ ते ८ जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल. तर विधानसभेत बीजेडी ९५ ते १०० जागांवर आणि भाजपा ४६ ते ५२ जागांवर लढू शकेल.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि बीजेडी यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा लवकरच केली जाऊ शकते. दरम्यान, भाजपा आणि बीजेडीमधील वरिष्ठ नेते सध्या संभाव्य युतीबद्दल भाष्य करण्याचे टाळत आहेत, परंतु दोन्ही पक्ष लवकरच औपचारिक युतीची घोषणा करतील, असे संकेत आहेत. तसेच, आज होणाऱ्या भाजपाच्या कोअर ग्रुपच्या बैठकीतही यावर चर्चा होणार आहे.
दरम्यान, भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली असून, सर्वच घटकांना सोबत घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी भाजपाचे नेते, पदाधिकारी कामाला लागले असून, प्रत्येक राज्यात जवळपास सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी बऱ्याच पक्षांची साथ मिळविण्यात भाजपाला यश आले आणि सोबतच विरोधकांचे बळ कमी करण्याची रणनीतीही बरीच यशस्वी झाली. त्यामुळे भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून, सर्वच राज्यांत तसे प्रयत्न सुरू केले आहेत.याशिवाय, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला. त्यामुळे भाजपाचे मनोबल उंचावले आहे.