आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 01:18 PM2024-05-21T13:18:37+5:302024-05-21T13:19:26+5:30
जोपर्यंत इंडिया आघाडी सक्रीय झाली तोवर खूप उशीर झाला होता. भाजपाने पहिलेच त्यांचं नुकसान करणाऱ्या जागांवर फोकस केला होता असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.
नवी दिल्ली - देशात NDA सरकार पुन्हा सत्तेत येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ जून रोजी २०१९ च्या निकालाप्रमाणेच किंवा त्याहून अधिक जागांनी पुन्हा सत्तेत येतील अशी भविष्यवाणी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची मुलाखत विविध वृत्तवाहिन्यांवर घेतली जात आहे. त्यातच एका मुलाखतीत ४ जूनच्या निकालाचं चित्र काय असेल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर पीके यांनीही त्यांचा अंदाज वर्तवला आहे.
प्रशांत किशोर म्हणाले की, पूर्व आणि दक्षिणेत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढणार असून त्यांच्या जागाही वाढताना दिसतात. या भागात जागांसोबत मतदानाची टक्केवारी वाढल्यानं भाजपाला दक्षिण पूर्व भागात १५-२० जागांचा फायदा होऊ शकतो. पश्चिम उत्तरमध्येही भाजपाला फारसं काही नुकसान होताना दिसत नाही. भलेही लोकांमध्ये भाजपा सरकारविरोधात नाराजी असेल परंतु व्यापकरित्या मोदी सरकारला हटवण्याबाबत लोकांमध्ये राग दिसत नाही, कारण भाजपाला आव्हान देण्यात विरोधक कमी पडलेत असं त्यांनी सांगितले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच जर तुम्ही २०१४ आणि २०१९ चे निकाल पाहिले तर निवडणूक पंडितांनी भाजपा २७२ पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही अशी भविष्यवाणी केली होती. यंदा भाजपाच्या बाजूने भविष्यवाणी होतेय. भाजपानं जागांचे लक्ष २७२ हटवून ३७२ इतकं केले आहे. भाजपाच्या या रणनीतीमुळेच बहुतांश रणनीतीकार भाजपाच्या विजयाची भविष्यवाणी करत आहेत. ३७० ते ४०० जागा पार करण्याच्या भाजपाच्या घोषणेमुळे विरोधी पक्ष अडकला आहे. जोपर्यंत इंडिया आघाडी सक्रीय झाली तोवर खूप उशीर झाला होता. भाजपाने पहिलेच त्यांचं नुकसान करणाऱ्या जागांवर फोकस केला होता असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर विरोधकांनी अनेक महिने काहीही एक्शन घेतली नाही. पंतप्रधानपदाचा कुठलाही चेहरा दिला नाही. भाजपाविरोधात विश्वासू आणि सक्षम चेहरा इंडिया आघाडीकडे नाही असं जनतेला वाटतं. परंतु आपल्याकडे मजबूत विरोधी पक्ष आहे ही चांगली गोष्ट झाली. सरकार कुणाचेही असो, पक्षाला मजबूत विरोधी पक्षाचा सामना करावा लागेल असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं.