लोकसभा निवडणुकीत मतदानाची छापील नोंद होणार
By admin | Published: February 24, 2016 02:40 AM2016-02-24T02:40:14+5:302016-02-24T02:40:14+5:30
२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदाराने केलेल्या मतदानाची छापील नोंद करण्याची सोय असलेली इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे देशभरातील सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करून
नवी दिल्ली : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदाराने केलेल्या मतदानाची छापील नोंद करण्याची सोय असलेली इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे देशभरातील सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिली जातील, असे मुख्य निवडणूक आयुक्त नसिम झैदी यांनी मंगळवारी येथे सांगितले.
एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात ‘लिव्हरेजिंग टेक्नॉलॉजी फॉर ट्रान्स्परन्ट अॅण्ड क्रेडिबल इलेक्शन्स’ या विषयावर बोलताना झैदी यांनी ही माहिती दिली. या व्यवस्थेमुळे मतदान प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
झैदी म्हणाले की, ‘पेपर ट्रेल आॅडिट’ची सोय असलेली मतदानयंत्रे मतदानासाठी पूर्णपणे वापरली जावी, अशी मागणी लोक आता करू लागले आहेत. ही व्यवस्था करतानाही मतदानाची गुप्तता पाळली जाईल, अशी व्यवस्था आम्ही केली आहे. वर्र्ष २०१९ पर्यंत देशात सर्वत्र ‘पेपर ट्रेल आॅडिट’ची सोय असलेली इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे (ईव्हीएम) वापरण्याची आमची योजना आहे.
व्हीव्हीपीएटी तंत्रज्ञान
यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानास ‘व्होटर व्हेरिफाईड पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) असे म्हटले जाते. यात मतदाराने केलेल्या मतदानाची कागदावर छापील नोंद करण्याची सोय असते. यात मतदाराचे नाव, त्याने कोणाला मत दिले इत्यादी तपशील नोंदविला जातो. अंतिम निकालाच्या वेळी वाद झाल्यास शहानिशा करण्यासाठी या नोंदी जपून ठेवता येतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)