भाजपला दुसरा झटका; गुजरातच्या दिग्गज नेत्याचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 06:55 PM2024-03-03T18:55:23+5:302024-03-03T18:57:48+5:30
Lok Sabha Elections: पवन सिंहनंतर आता गुजरातच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
Gujarat Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी(दि.2) 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पण, यादी आल्यानंतर चोवीस तासांच्या आत पक्षाला दोन झटके बसले आहेत. आधी भोजपुरी स्टार पवन सिंह यांनी पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला, त्यानंतर आता गुजरातमधील दिग्गज नेत्यानेही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भाजपच्या 195 उमेदवारांची घोषणा केली. यात गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना मेहसाणा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पण, आता त्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली आहे. नितीन पटेल यांनी फेसबुक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उमेदवारी मागे घेण्याचे कारण दिले नाही, पण नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी देवाला प्रार्थना केली. तसेच, सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे आभारही मानले.
कोण आहेत नितीन पटेल?
नितीन पटेल भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. पटेल यांनी 2021 मध्ये मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी गुजरातच्या अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केले आहे.
भाजपने दिले लोकसभेचे तिकीट; आता अचानक पवन सिंह यांचा निवडणूक लढवण्यास नकार
भाजपला दोन धक्के
दरम्यान, भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहला भाजपने पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी जाहीर केली होती. याबाबत त्याने पक्षाचे आभारही मानले. पण, आज अचानक पवन सिंहने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. याबाबत पवन सिंहकडून अधिकृत कारण देण्यात आले नाही. आता नितीन पटेल यांनीही निवडणूक न लडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला या दोन्ही ठिकाणांसाठी नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत.