आमदाराला बुटाने मारहाण करणाऱ्या खासदाराला भाजपकडून नारळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 17:00 IST2019-04-15T17:00:06+5:302019-04-15T17:00:25+5:30
शरद त्रिपाठी यांचे वडील आणि भाजपचे अध्यक्ष रमापतीराम त्रिपाठी यांना भाजपकडून देवरिया मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीतून पाच खासदारांचे नाव कापण्यात आले आहे.

आमदाराला बुटाने मारहाण करणाऱ्या खासदाराला भाजपकडून नारळ
लखनौ - लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज उमेदवारांची २१वी यादी जाहीर केली. या यादीत उत्तर प्रदेशातील ७ उमेदवारांचे नाव आहे. यामध्ये संतकबीर नगरमधील आमदाराला बुटाने मारहाण करणारे खासदार शरद त्रिपाठी यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
शरद त्रिपाठी यांचे वडील आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रमापतीराम त्रिपाठी यांना भाजपकडून देवरिया मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीतून पाच खासदारांचे नाव कापण्यात आले आहे. आता केवळ घोसी मतदार संघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा बाकी आहे. तसेच योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांना आंबेडकरनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान भोजपुरी अभिनेता रवी किशन यांना भाजपकडून गोरखपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. आता घोसी मतदार संघ सोडल्यास उत्तर प्रदेशातील पूर्वेकडील सर्व मतदार संघातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे बसपा-सपा महायुती सोडून भाजपमध्ये दाखल झालेले प्रविण निषाद यांना भाजपने संतकबीर नगरमधून उमेदवारी दिली आहे. निषाद सध्या गोरखपूरमधून उमेदवार आहेत.