आप नेते कुमार विश्वास भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 10:59 AM2019-04-03T10:59:59+5:302019-04-03T11:03:17+5:30
आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे असलेले कवी कुमार विश्वास आता भाजपाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे असलेले कवी कुमार विश्वास आता भाजपाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दिल्लीतील भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली. यावरुन कुमार विश्वास आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत असतील, अशी चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. जर, कुमार विश्वास भाजपामध्ये गेले तर त्यांना भाजपा पूर्व दिल्ली मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतो.
अरविंद केजरीवाल यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे राज्यसभा निवडणुकीची आपकडून उमेदवारी देताना कुमार विश्वास यांचा पत्ता कापण्यात आला होता. पक्षाच्या विविध कार्यक्रमांतही त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर आता राजस्थानच्या प्रभारीपदावरून दूर करण्यात आल्याने कुमार विश्वास आणि आपमधील दुरावा आणखीच वाढल्याचे दिसून आले. याचबरोबर, गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून कुमार विश्वास टीका करताना दिसत आहेत.
दरम्यान, जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. तसा राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, व्यापक जनाधार असलेल्या नेत्यांसोबत लोकप्रिय कलाकर मंडळींनाही पक्षात सामील करुन घेण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. यात भाजपा सुद्धा आघाडीवर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेता रवी किशन आणि दिनेश लाल यादव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.