राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 04:51 PM2024-06-06T16:51:56+5:302024-06-06T17:02:43+5:30

उत्तर प्रदेशातील अयोध्येत भाजपच्या पराभवाचे कारण सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.

Lok Sabha Result People of Ayodhya and surrounding areas voted against the BJP says Akhilesh Yadav | राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."

राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."

Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश लोकसभेच्या निकालावरुन सध्या देशभरात चर्चा सुरु झालीय. सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अयोध्या पूर्वीचे फैजाबाद लोकसभा मतदारसंघातही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. ज्या राम मंदिराच्या मुद्दा या निवडणुकीत देशभरात चर्चेत होता तिथेच भाजपचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अयोध्येत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा पराभव केला आणि हा चर्चेचा विषय बनला. अनेकांनी या पराभवाची कारणमीमांसा केली असली तरी समाजवादी पक्षाने त्याचे कारण सांगितले आहे.

अयोध्या मतदारसंघात सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव केला आहे. लल्लू सिंह हे २०१४ पासून या जागेवरून खासदार होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत अवधेश प्रसाद यांनी भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा ५० हजार मतांनी पराभव केला. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर चार महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. संपूर्ण निवडणूक प्रचारात राम मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र असे असलं तरी भाजपचा अयोध्येत पराभव झाला. यावर आता सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाष्य केले.

"मी अयोध्येतील जनतेचे आभार मानतो. तुम्ही अयोध्येतील लोकांचे दुःख आणि वेदना पाहिल्या असतील. त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला गेला नाही. त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांची जमीन बाजारभावाच्या बरोबरीने घेतली गेली नाही.  तुम्ही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची जमीन जबरदस्तीने हिसकावून घेतली आहे. तुम्ही पुण्याचे काम करताना गरिबांना उखडून काढत आहात. त्यामुळेच अयोध्या आणि परिसरातील लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला एकूण ३७ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला ३३ जागांवर विजय मिळवता आला. "उत्तर प्रदेशातील जनतेने मुद्द्यांवर मतदान केले आणि सार्वजनिक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. जिथे सरकार बनवण्याचा किंवा न बनवण्याचा प्रश्न असतो, तिथे सरकार बनते आणि बहुमत नसले तर अनेकांना खूश करून सरकार बनवले जाते," अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिली आहे.

Web Title: Lok Sabha Result People of Ayodhya and surrounding areas voted against the BJP says Akhilesh Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.