MA, M.Ed, M.Phil अन् NET उत्तीर्ण; संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या नीलमचा भाऊ म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 07:06 PM2023-12-13T19:06:27+5:302023-12-13T19:10:06+5:30
Parliament Winter Session 2023: संसदेबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी करणाऱ्या नीलमला पोलिसांनी अटक केली असून, कसून तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
Parliament Winter Session 2023: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. या दोघांनी सभागृहातील बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला. सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. याप्रकरणी चार जणांना पकडण्यात आले असून, अधिक तपास सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे. या घटनेवेळी संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या नीलमच्या भावाने तिच्याविषयी माहिती देताना, ती उच्चशिक्षित असल्याचे सांगितले.
नहीं चलेगी नहीं चलेगी.. तानाशाही नहीं चलेगी... अशी घोषणाबाजी करत संसद सभागृहात आणि संसदेच्या बाहेरही युवकांनी आपला रोष व्यक्त केल्याचे दिसून आले. सन २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाला होता. या घटनेला २२ वर्ष झाली असून, यानिमित्ताने शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. याच दिवशी सुरक्षेत एवढी मोठी चूक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संसदेत हा प्रकार घडल्यावर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. यात सामील असलेल्या नीलम हिच्या भावाला याबाबत विचारणा करण्यात आली.
आम्हाला माहितीच नाही की ती दिल्लीत गेली आहे
नीलम हिचा भाऊ रामनरेश यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. नीलम माझी मोठी बहीण आहे. ती दिल्लीला गेल्याचे आम्हाला माहिती नव्हते. आम्हाला एवढेच माहिती होते की आम्ही तिला हिसार येथे अभ्यासासाठी पाठवले आहे. ती परवा आली होती आणि काल परत गेली. ती BA, MA, B.Ed, M.Ed, CTET, M.Phil आणि NET पात्र आहे. ती उच्चशिक्षित आहे. बेरोजगारीचा मुद्दा तिने अनेकदा मांडला आहे. शेतकरी आंदोलनात ती सहभागी झाली होती. ते तिचे पहिले आंदोलन होते. या कारणास्तव आम्ही त्याला हिसार येथे पाठवले होते. या घटनेला ६ महिने झाले आहेत. वडिलांचे मिठाईचे दुकान आहे. माझा भाऊ आणि मी दुधाचा व्यवसाय करतो. तिने हे चांगले केले की चुकीचे ते आम्हाला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया भावाने दिली.
दरम्यान, नीलमची आई सरस्वती यांनी सांगितले की, ती बेरोजगारीमुळे खूप चिंतेत होती. आम्ही त्याच्याशी बोललो पण तिने आम्हाला दिल्लीबद्दल काहीही सांगितले नाही. ती मला सांगायची की ती खूप शिकलेली आहे पण तरीही तिला नोकरी नाही. आम्ही गरीब लोक आहोत आणि कसेबसे जीवन जगत आहोत, असे सरस्वती यांनी म्हटले आहे.