खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिली होती धमकी; दिवसही तोच, लोकसभा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 04:24 PM2023-12-13T16:24:00+5:302023-12-13T16:26:15+5:30

Parliament Winter Session 2023: काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने १३ डिसेंबरला भारतीय संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

lok sabha security breach khalistani terrorist gurwant singh pannu had threatened to attack on parliament | खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिली होती धमकी; दिवसही तोच, लोकसभा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिली होती धमकी; दिवसही तोच, लोकसभा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Parliament Winter Session 2023: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. या दोघांनी सभागृहातील बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला. सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. या दोघांनाही पकडण्यात यश आले असून, चौकशीदरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. खलिस्तानी दहशतवादी गुरवंत सिंग पन्नू याने काही दिवसांपूर्वी संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. 

विशेष म्हणजे सन २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. याच दिवशी सुरक्षेत एवढी मोठी चूक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेचा संसद हल्ल्याशी संबंध नसल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या घटनेचा संसदेवरील हल्ल्याशी संबंध नसला तरी देशातील सत्तागृहात सुरक्षेचा एवढा मोठा निष्काळजीपणा समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिली होती धमकी

काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हिडिओ जारी करून १३ डिसेंबरला भारतीय संसदेवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. पन्नूने भारतावर आपल्या हत्येचा अयशस्वी कट रचल्याचा आरोप केला होता. यानंतर ही धमकी देण्यात आली होती. पन्नूचा धमकीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर होत्या. सुरक्षा यंत्रणांनी सांगितले होते की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या K-2 (काश्मीर-खलिस्तान) डेस्कने पन्नूला भारतविरोधी कट पसरवण्याचा तिचा अजेंडा पुढे नेण्याची सूचना केली होती, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आली होती. गुरवंत सिंग पन्नू अमेरिकेतील शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या आहे. या संघटनेवर भारतात बंदी असून, पन्नूला भारतीय तपास यंत्रणांनी वाँटेड घोषित केले आहे.

दरम्यान, लोकसभा सभागृहात गोंधळ घालणाऱ्या तरुणाला खासदारांनी पकडले आणि चांगला चोप दिला. यानंतर त्याला सुरक्षा यंत्रणांकडे सोपवण्यात आले. यामध्ये नीलम आणि अमोल शिंदे यांना पोलिसांनी अटक केली असून, संसदेच्या परिसरातून एक महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. नही चलेगी नही चलेगी.. तानाशाही नही चलेगी... अशी घोषणाबाजी करत संसद सभागृहात आणि संसदेच्या बाहेरही युवकांनी आपला रोष व्यक्त केला. 


 

Web Title: lok sabha security breach khalistani terrorist gurwant singh pannu had threatened to attack on parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.