शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 10:56 PM2022-07-19T22:56:48+5:302022-07-19T23:03:37+5:30
Rahul Shewale : ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांच्या लोकसभेतील शिवसेनेच्या नेतेपदी आणि भावना गवळी यांच्या प्रतोदपदी नियुक्तीला मान्यता दिली आहे.
नवी दिल्ली : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतील आमदारांपाठोपाठ खासदारही एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या संपर्कात आले आहेत. शिंदे गटाला लोकसभेतील शिवसेनेच्या 12 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. यानंतर लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. दरम्यान, ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांच्या लोकसभेतील शिवसेनेच्या नेतेपदी आणि भावना गवळी यांच्या प्रतोदपदी नियुक्तीला मान्यता दिली आहे.
शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची आज भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. या पत्रात राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले. शिंदे गटाला लोकसभेतील शिवसेनेच्या 12 खासदारांनी पाठिंबा दिला आहे. यात राहुल शेवाळे, भावना गवळी, कुपाल तृपाणे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावित, डॉ. श्रीकांत शिंदे या खासदारांचा समावेश आहे.
Lok Sabha Speaker, Om Birla has accepted the demand of Shinde faction of Shiv Sena to change the leader of the House. Now the leader of Shiv Sena in the house will be Rahul Shewale. Whereas, Bhavana Gawali has been retained as the Chief Whip: Sources
— ANI (@ANI) July 19, 2022
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज 12 खासदारांसोबत महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. यावेळी शिवसेनेच्या लोकसभेतील सर्व 12 खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांना वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र दिले आहे. या सर्व 12 खासदारांचे मी स्वागत करतो. त्यांनी घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.