सभागृहात त्रुटी जाणवतात का? लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी प्रश्नांना थेट उत्तरे देण्याचे टाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 06:46 AM2021-12-23T06:46:49+5:302021-12-23T06:47:29+5:30
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी एकही दिवस सभागृहात उपस्थित नव्हते.
शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी एकही दिवस सभागृहात उपस्थित नव्हते आणि प्रश्नोत्तर तासात प्रश्न विचारणारे खासदारही हजर नसले, तरी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना यात काहीही त्रुटी दिसत नाही.
कामकाज संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बिर्ला बोलले. परंतु, कोणत्याही प्रश्नाचे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले नाही. अजय मिश्रा यांनी संपूर्ण अधिवेशनात लोकसभेत न येण्याची परवानगी घेतली होती का? या प्रश्नावर बिर्ला म्हणाले, “जेवढे खासदार सुटीसाठी अर्ज करतात, ती यादी आमच्याकडे आहे.”
लखीमपूर खिरी घटनेवर विरोधी पक्ष चर्चेची मागणी करत होते. तुम्ही चर्चा का करून घेतली नाही? असे विचारल्यावर सभागृह नियम आणि परंपरांनी चालते. चर्चा करण्याचीही एक निश्चित प्रक्रिया आहे, असे ते म्हणाले. प्रश्नोत्तर तासात बहुतांश सदस्य हजर नव्हते. अधिकांश मंत्री गैरहजर होते. हे लोक संसदेला गांभीर्याने घेत नाहीत का? या प्रश्नावर बिर्ला म्हणाले, “सगळ्या सदस्यांनी प्रश्नोत्तर तासात सभागृहात असायला पाहिजे. सगळे सदस्य सभागृहात येतात आणि येऊ इच्छितातही आणि यायलाही हवेत. मी सगळ्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहावे, असा आग्रह करीन.”
ही घोषणा येथे नाही
बिर्ला यांनी नवी संसद नोव्हेंबर २०२२ पर्यंत तयार होईल, असे म्हटले. परंतु, विद्यमान संसदेत लावण्यात आलेल्या नेत्यांची छायाचित्रे आणि पुतळे नव्या संसदेत नेण्यात येतील का, यावर काही सांगितले नाही. ते म्हणाले, पत्रकार परिषदेत ही घोषणा केली जात नाही.