लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनांनी काँग्रेसच्या २५ खासदारांना केले निलंबित
By admin | Published: August 3, 2015 03:58 PM2015-08-03T15:58:09+5:302015-08-03T16:16:38+5:30
काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातल्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तब्बल २५ खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले.
ऑनलाइन लोकमत
वारंवार ताकीद देऊनही तसेच चर्चेसाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गोंधळ घालणा-या तब्बल २५ खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे.
काम न केल्यास खासदारांचे भत्ते कापण्याचा कतित प्रस्ताव, सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी आदी विषयांवर काँग्रेसच्या खासदारांनी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून रान उठवले आहे. जोपर्यंत आरोप ठेवलेल्या नेत्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज होऊ न देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर या विषयांवर चर्चा करण्यास आपण तयार असून या नेत्यांनी कुठलाही गुन्हा केला नसून त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका भाजपाने घेतल्यामुळे ही कोंडी कशी फुटणार असा प्रश्न अधिवेशन सुरू झाल्यापासून पडलेला आहे.
त्यात भर म्हणजे सभागृहामध्ये निषेधाचे फलक आणण्यास मनाई असताना काँग्रेसचे खासदार सातत्याने असे फलक दाखवत होते तसेच अध्यक्षांसमोरच्या वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करत होते. संख्याबळाच्या जोरावर भाजपा मुजोरीची भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला तर चर्चा झाली तर काँग्रेसचे बिंग फुटेल म्हणून काँग्रेस चर्चाच होऊ देत नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
सोमवारी गेल्या आठवड्याप्रमाणेच संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळाचेच वातावरण राहीले आणि अखेर लोकसभेमध्ये अध्यक्षांनी काँग्रेसच्या १३ जणांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याची अभूतपूर्व घटना घडली.