लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच?; 'या' महिला नेत्याचे नाव स्पर्धेत आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 06:20 AM2024-06-18T06:20:05+5:302024-06-18T06:20:48+5:30
विद्यमान सरकारमध्ये अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याने भाजपला हे पद स्वतःकडेच ठेवायचे आहे.
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष लोकसभा अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणार आहे. तर, मित्रपक्ष तेलुगु देसमला उपाध्यक्षपद देण्यास भाजप तयार आहे. अध्यक्षपदासाठी लोकसभा मित्रपक्षांची सहमती मिळविण्याची जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. लोकसभा अध्यक्ष हे महत्त्वाचे पद आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे.
तेलगू देसमला उपाध्यक्षपद देण्यास राजी केले जात आहे. टीडीपीकडून अध्यक्षपदासाठी दबाव आणला जात आहे. परंतु विद्यमान सरकारमध्ये अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याने भाजपला हे पद स्वतःकडेच ठेवायचे आहे. यासंदर्भात भाजप चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार, चिराग पासवान, एकनाथ शिंदे, अजित पवार या सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांशी बोलून त्यांची सहमती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.
पुरंदेश्वरी यांचे नाव चर्चेत
चंद्राबाबू नायडूंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने चंद्राबाबू नायडू यांच्या मेहुणी पुरंदेश्वरी यांचे नाव पुढे केले आहे. आंध्र प्रदेशात भाजप आणि टीडीपी यांच्यात युती करण्यातही पुरंदेश्वरी यांचा मोठा वाटा आहे. मात्र, भाजपने आणखी दोन ते ते तीन तीन नावे पुढे केली आहेत. मित्रपक्षांमध्ये यापैकी ज्या नेत्याच्या नावावर एकमत होईल, त्यांना लोकसभा अध्यक्ष केले जाईल. २४ जूनपासून सुरु होणाऱ्या संसद अधिवेशनादरम्यान २६ जून रोजीच अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.