‘सूटबूट की सरकार’ म्हणत ‘लोकसभा’ जिंकली
By Admin | Published: April 20, 2015 11:53 PM2015-04-20T23:53:11+5:302015-04-20T23:53:11+5:30
सुटी घालवून परतलेल्या राहुल गांधी यांचे आक्रमक रूप सोमवारी लोकसभेत बघायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गरिबांचा कैवारी कोण’ ही स्पर्धा सुरू केल्याचे
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
सुटी घालवून परतलेल्या राहुल गांधी यांचे आक्रमक रूप सोमवारी लोकसभेत बघायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गरिबांचा कैवारी कोण’ ही स्पर्धा सुरू केल्याचे पाहता राहुल यांनी लोकसभेचे सभागृह जिंकत निसटती का होईना बाजी मारली आहे. त्यांचे ‘सूट बूट की सरकार’ हे विधान लगेचच व्हायरल होऊन त्याची चर्चाही सुरू झाली.
आपल्या २२ मिनिटांच्या सडेतोड भाषणात राहुल यांनी कधी किस्से तर कधी उपरोधिक टोलेबाजी केली. गरीब शेतकऱ्यांची किंमत चुकवत ‘सूट बूट की सरकार’ मोजक्या कॉर्पोरेट हाऊसची सेवा करीत आहे, असे त्यांनी म्हटले तेव्हा भाजपचे काही मंत्री सभागृहात अवाक्पणे बघत होते. मोदी सरकारवर कधी वैयक्तिक टीका करतानाही या मंत्र्यांनी आक्षेप घेण्याचे टाळले. उलट त्यांना बोलू द्या म्हणत संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी भाजपच्या खासदारांना शांत केले. आपली वेळ येईल तेव्हा उत्तर देऊ, असे म्हणत नायडूंनी त्यांची समजूत काढली.
१८० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असे तज्ज्ञ सांगत असताना पंतप्रधान मोदी १०६ लाख हेक्टर तर कृषिमंत्री केवळ ८० लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे सांगत आहेत. खरे काय? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. त्यावर राधामोहनसिंग म्हणाले की, विविध राज्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अंदाज लावण्यात आला आहे. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलेल्या चर्चेतून ८० लाख हेक्टरचा आकडा मिळाला आहे.
‘मन की बात’ऐवजी शेतकऱ्यांकडे जा
मोदींनी गाजावाजा केलेल्या ‘मन की बात’वर उपरोधिक शेरा मारताना राहुल गांधी म्हणाले, पीडित शेतकऱ्यांशी ‘मन की बात’ करण्याऐवजी पंतप्रधान देशात फिरत का नाहीत. त्यावर भाजपच्या नेत्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही.