नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; समोर आली NDA सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:03 PM2024-06-04T21:03:34+5:302024-06-04T21:04:07+5:30
Lok Sabha Elections Result 2024 : भाजपच्या नेतृत्वातील NDA ने 290+ जागा मिळवून तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे.
Lok Sabha Elections Result 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अतिशय धक्कादायक निकाल लागले आहेत. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 300 चा आकडाही पार करता आला नाही, पण एनडीएला 290+ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता या सरकारचा शपथविधी कधी होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनडीए सरकारचा शपथविधी येत्या 9 जून रोजी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती भवनाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार बुधवार (5 जून) ते 9 जून या कालावधीत राष्ट्रपती भवनाचे सर्किट-1 सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे. यावेळी राष्ट्रपती भवनात नव्या सरकारच्या शपथविधीची तयारी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
NDA च्या विजयावर PM मोदी काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेचे आभार मानले आहेत. पीएम मोदी म्हणाले की, "देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला. या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो. मी देशवासियांना खात्री देतो की त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो."
जनतेचा विश्वास मोदींवर- अमित शाह
दरम्यान, आजच्या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ''एनडीएचा हा विजय म्हणजे देशासाठी आयुष्य खपवणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांच्या अढळ विश्वासाचे प्रतिबिंब आहे. मोदीजींच्या विकसित भारताच्या व्हिजनवर जनतेचा हा विश्वास आहे. हा सार्वजनिक आशीर्वाद म्हणजे मोदीजींच्या गरीब कल्याण, वारशाचे पुनरुज्जीवन, महिलांचा स्वाभिमान आणि शेतकरी कल्याणाच्या कामाच्या यशाचा आशीर्वाद आहे. या जनादेशासह विकासाच्या प्रवासाला अधिक गती आणि बळ देण्यासाठी न्यू इंडिया तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला सलग तिसऱ्यांदा देश सेवेची संधी दिल्याबद्दल मी देशातील जनतेला सलाम करतो. सलग तिसऱ्या विजयाने जनतेचा विश्वास फक्त मोदींवर असल्याचे स्पष्ट झाले आहे," असे शाह म्हणाले," असे शाह म्हणाले.
या राज्यांमध्ये भाजपचे नुकसान
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, एनडीए 290 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे, त्यापैकी एकटा भाजप 240 जागांवर पुढे आहे. तर इंडिया आघाडी 230 जागांवर आघाडीवर असून, काँग्रेसने 100 जागांवर आघाडी कायम ठेवली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 2019 च्या तुलनेत येथे भाजपच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.