नव्या जाहिरात मॉडेल विकासात ‘लोकमत’ समूह महाराष्ट्रातील अग्रदूत; ग्रुपएम’चा रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 07:20 AM2022-02-19T07:20:01+5:302022-02-19T07:20:37+5:30
जाहिरात क्षेत्रासाठी भारताचा बाजार जगात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. येणाऱ्या वर्षातही तो असाच वाढत राहील.
‘ग्रुपएम’चा अहवाल : 2022 मध्ये जाहिरात क्षेत्र घेणार मोठी झेप
नवी दिल्ली : २०२२ मध्ये आदल्या वर्षाच्या तुलनेत जाहिरात क्षेत्राचा खर्च २२.२ टक्क्यांनी वाढून १०७,९८७ कोटी रुपये होईल, असा अंदाज ‘ग्रुपएम’ने जारी केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. २०२१ मध्ये हा खर्च ८८,३३४ कोटी होता. कोविडपूर्व काळाच्या म्हणजेच २०१९ च्या तुलनेत (८६,०६७ कोटी) ही वाढ २५ टक्के आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘ग्रुपएम’ने जाहिरात व माध्यम उद्योग यावर जारी केलेल्या ‘जाहिरातींवरील खर्च’ (अॅडेक्स) या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
अहवालात म्हटले आहे की, जाहिरात क्षेत्रासाठी भारताचा बाजार जगात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. येणाऱ्या वर्षातही तो असाच वाढत राहील. या क्षेत्रात जगात भारताचा क्रमांक ९ वा आहे. २०२२ मध्ये भारतातील जाहिरातींवरील खर्च १९,६०० कोटी रुपयांनी वाढणार
आहे. जाहिरातींच्या बाबतीत दूरचित्र वाहिन्यांवर डिजिटल क्षेत्र मात करीत आहे, ही सध्याची या क्षेत्रातील मोठी घडामोड असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात ‘ग्रुपएम दक्षिण आशिया’चे सीईओ प्रशांत कुमार यांनी सांगितले की, जाहिरातीच्या बाबतीत आता डिजिटल माध्यम टीव्हीवर मात करताना दिसत आहे.
वास्तविक, हा कल मागील अनेक वर्षांपासून विकसित होत होता. कोविड-१९ साथीने त्याला अधिक गती दिली आहे. साथीने डिजिटल क्षेत्राच्या पारड्यात अधिकचा हिस्सा टाकण्यात मदत केली आहे. गतिमान वस्तू म्हणजेच एफएमसीजी हे सध्या जाहिरात क्षेत्राच्या चालकस्थानी असल्याचे दिसून येत आहे. या क्षेत्राकडून सर्वाधिक महसूल येत आहे. टेलिकॉम आणि वाहन उद्योगही हळूहळू गती घेत आहेत. २०२२ मध्ये डिजिटल मीडियावरील जाहिराती ३३ टक्क्यांनी वाढून ४८,६०३ कोटी रुपये होतील, असे अनुमान आहे.
अहवालात म्हटले आहे की, या वर्षात मुद्रित माध्यमांच्या जाहिरातींत ५ टक्के वाढ होईल, असे अनुमानित करण्यात आले आहे. तसेच टीव्ही माध्यमात १५ टक्के वृद्धी अपेक्षित आहे. जाहिरात क्षेत्रातील वृद्धीचे नेतृत्व ई-कॉमर्स, एफएमसीजी आणि वाहन उद्योग करीत आहे.
‘ग्रुपएम’च्या अहवालात म्हटले आहे की, मुद्रित माध्यमे जाहिरात क्षेत्राला अजूनही प्रेरणा देत आहेत. या प्रेरणेतून नवी ‘बिझनेस मॉडेल्स’ उत्क्रांत होताना दिसत आहेत. यातून ‘फलश्रुती-बंधित उत्तरदायी व्यवहार’ (आऊटकम-लिंकड् अकाऊंटेबल डील्स) होताना दिसत आहेत. ही मुद्रित माध्यमांची शक्ती आहे.
‘ग्रुपएम’ समूहाचे अध्यक्ष (गुंतवणूक व मूल्यनिर्धारण) सिद्धार्थ पराशर यांनी सांगितले की, येणाऱ्या वर्षात डिजिटल माध्यमे जाहिरातींचा मोठा हिस्सा हस्तगत करतील, असे दिसून येत आहे. त्याचबरोबर संकटकाळानंतर आऊट-ऑफ-होम (ओओएच) जाहिराती आणि सिनेमाही लक्ष्यवेधी पुनरुज्जीवन करीत आहे. २०२१ मध्ये ई-कॉमर्सवरील जाहिरातींत वाढ दिसून आली होती. ओटीटी माध्यमानेही चांगली वृद्धी नोंदविली होती. इन्फ्ल्युएन्सर्स आणि ‘शॉर्ट फॉरमॅट व्हिडीओ’ यांचा या माध्यमांवर २०२१ मध्ये बोलबाला राहिला. हा कल २०२२ मध्येही कायम राहील, असा अंदाज आहे.
वृत्तपत्रांवरच लोकांचा विश्वास
अहवाल म्हणतो की, मुद्रित माध्यमांवर लोकांचा अजूनही विश्वास असल्याचे या क्षेत्रातील जाहिरात वृद्धीवरून दिसून येते. सर्वच श्रेणीतील जाहिरातींच्या बाबतीत वृत्तपत्रे सातत्याने वृद्धी दर्शवीत आहेत. विशेषत: बातम्या आणि विश्लेषण याबाबतीत वृत्तपत्रे अधिक विश्वासार्ह समजली जातात. मुद्रित माध्यमांची वाचकांना बांधून ठेवण्याची क्षमता मोठी आहे. लोक वृत्तपत्रे आजही काळजीपूर्वक वाचतात. याच कारणांमुळे टीव्ही आणि त्यानंतर डिजिटल माध्यमांचा उदय झाल्यानंतरही मुद्रित माध्यमातील जाहिरातींच्या वृद्धीत सातत्य दिसून आले आहे.
सतत नवीन प्रयोग केल्यामुळे यश
‘ग्रुपएम’च्या अहवालात म्हटले आहे की, जाहिरातींचे नवनवे मॉडेल विकसित करण्याच्या बाबतीत लोकमत समूह महाराष्ट्राचा अग्रदूत ठरला आहे. विविध माध्यमातील दरी सांधणारी नावीन्यपूर्ण जाहिरात प्रारूपे लोकमत समूहाने विकसित केली आहेत. ही प्रारूपे विविध माध्यमांना एकमेकात सहजपणे सामावून घेताना दिसतात. ब्रॅन्डसाठी आवश्यक असलेले अभिनव शब्दविन्यास आणि डिजिटल ब्रॅन्डसाठी आवश्यक असलेली रस्त्यावरील नातेजुळवणी, यात लोकमत समूहाने नित्यनूतन प्रयोग केले आहेत आणि हे प्रयोग कमालीचे यशस्वी झाले आहेत.