Lokmat National Conclave: नागालँडमध्ये राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा भाजपाला मान्य? मीनाक्षी लेखींचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 16:38 IST2023-03-14T16:37:43+5:302023-03-14T16:38:21+5:30
Lokmat Parliamentary Awards 2022 : नागालँडमधील भाजपाच्या आघाडी सरकारला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला पाठिंबा भाजपाला मान्य आहे का, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.

Lokmat National Conclave: नागालँडमध्ये राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा भाजपाला मान्य? मीनाक्षी लेखींचं मोठं विधान
नुकत्याच झालेल्या पूर्वोत्तर भारतातील तीन राज्यातील निवडणुकीत भाजपाने त्रिपुरामध्ये स्पष्ट बहुमतासह तर नागालँडमध्ये मित्रपक्षासोबत आघाडी करून सत्ता मिळवली होती. त्यानंतर नागालँडमधील भाजपाच्या आघाडी सरकारला शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला पाठिंबा भाजपाला मान्य आहे का, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. भाजपाच्या नेत्या मीनाक्षी लेखी यांनी नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला पाठिंबा भाजपाने स्वीकारला असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे.
लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत होत आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्याने 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. 'भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ' (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडत आहेत. या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या भाजपा नेत्या मीनाक्षी लेखी यांना नागालँडमध्ये भाजपा आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याबाबत विचारले असता त्यांनी हे विधान केले.
मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, तो पक्षही लोकशाहीचाच भाग आहे. त्यामुळे आघाडी बनवली जाऊ शकते. यावेळी भाजपानेच आघाडी केली तर लोकशाही का? असं विचारलं असता मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, आम्ही काँग्रेसच्या आघाडीवर काही बोललेलो नाही. तुम्ही निवडणुका लढवता. त्यातून तुम्ही काही जागा जिंकता. त्या जागांच्या आधारावर लोकांनी त्रिशंकू कौल दिला हे समोर आलं. स्पष्ट कौल दिलेला नाही. तो समोर ठेवून सरकार बनवायचं होतं जनतेचंही हेच मत आहे. जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे, असं उत्तर त्यांनी दिलं.