लोकमत संसदीय पुरस्कार सोहळा आज दिल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:58 AM2018-12-13T11:58:54+5:302018-12-13T13:22:04+5:30
आठ सदस्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार : ‘राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान’ या विषयावर ‘लोकमत कॉन्क्लेव्ह’
नवी दिल्ली : लोकशाही व्यवस्था सक्षम करण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान गुरुवारी ‘लोकमत’संसदीय पुरस्कार सोहळ्याद्वारे दिल्लीतील समारंभात होणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांची उपस्थिती असेल. हा सोहळा डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरच्या सभागृहात सायंकाळी होणार आहे.
लोकमतच्या दिल्ली आवृत्तीच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आधी ‘राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान’ या विषयावर ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या कॉन्क्लेव्हमध्ये ओमर अब्दुल्ला, प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या मुलाखती ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा व बरखा दत्त घेतील. ‘कॉन्क्लेव्ह’मध्ये वक्ते काय बोलतात याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.
शरद पवार, जोशी ‘जीवनगौरव’चे मानकरी
च्उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिल्या जाणाºया लोकमत संसदीय पुरस्कारातील जीवनगौरव पुरस्कारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
खा. शरद पवार (राज्यसभा) व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी (लोकसभा), यांची ज्युरी बोर्डाने निवड केली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील भाजपा सदस्य निशिकांत दुबे यांची उत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड झाली आहे. संसदेत संस्मरणीय कामकाज करणाºया श्रीमती कणिमोळी, हेमा मालिनी, श्रीमती रमा देवी, छाया वर्मा या महिला खासदारांनाही लोकमत संसदीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. लोकमत संसदीय पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवर खासदारांची निवड करण्याचे काम ज्युरी मंडळाकडे सोपविण्यात आले होते.