देवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:33 PM2018-12-13T18:33:21+5:302018-12-13T18:34:16+5:30
तीन राज्यं भाजपामुक्त कशी म्हणता येतील? राजकारणात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. जनताच संपवू शकते.
नवी दिल्लीः राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकूणच भाजपाला धडा शिकवणारा आहे, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, असं म्हटलं जातंय. परंतु, हे निकाल म्हणजे भाजपाचा मोठा पराभव आहे, हे मानायलाच भाजपाचे नेते तयार नसल्याचे संकेत आज मिळाले. 'लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड' सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये आधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकड्यांचा खेळ करून पराभवाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
तीन राज्यं भाजपामुक्त कशी म्हणता येतील? राजकारणात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. जनताच संपवू शकते. आमचा पराभव झाला हे मान्य, पण राजस्थानमध्ये तर दर पाच वर्षांनी सरकारं बदलतातच. यावेळी भाजपा आणि काँग्रेसमध्ये फक्त ०.५ टक्के मतांचा फरक आहे. जो जिता वही सिकंदर, पण भाजपाला नाकारलं असं म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद मुख्यमंत्र्यांनी यांनी केला. त्यावेळी मुलाखतकार, इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी छत्तीसगडमधील पराभवाकडे त्यांचं लक्ष वेधलं. त्यावर, आम्ही आत्मपरीक्षण करू, असं फडणवीस म्हणाले. काँग्रेसमुक्त भारत याचा अर्थ काँग्रेस पक्षापासून मुक्ती असा नाही, तर काँग्रेसने निर्माण केलेल्या प्रवृत्तीपासून मुक्तता असा होता, असंही त्यांनी सांगितलं.
गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटरीवरून उतरलेली गाडी पटरीवर आणली आहे आता ती वेगाने पुढे जाईल, असं सांगत लोकसभेत पुन्हा मोदी सरकारच येईल, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. नोटाबंदी, जीएसटीनंतर ११ राज्यांतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कितीतरी निवडणुका भाजपाने जिंकल्यात. त्यामुळे एक निवडणूक हरल्यावर, आम्ही पुन्हा निवडूनच येणार नाही, असा गोंधळ करणं बरोबर नाही, अशा शब्दांत त्यांनी माध्यमांचेही कान खेचले.