पप्पू भाजपासाठी परमपूज्य झालेत?; बघा, राज ठाकरेंच्या चिमट्याला मुख्यमंत्र्यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:04 PM2018-12-13T17:04:26+5:302018-12-13T17:04:36+5:30
लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड सोहळ्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी घेतली.
नवी दिल्लीः राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला पराभवाचा धक्का बसल्यानंतर, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं बाजी मारल्यानंतर, पप्पू आता परमपूज्य झालेत, अशी मार्मिक टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टोल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
'राज ठाकरे हे माझे मित्र आहेत. ते वेगवेगळ्या विषयांवर मतं मांडत असतात. पण त्यांना कुणीच गांभीर्याने घेत नाही आणि तुम्हीही घेऊ नका', असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी मारला. लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड सोहळ्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या 'लोकमत नॅशनल कॉन्ल्केव्ह'मध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी घेतली. त्यावेळी एकापाठोपाठ एक येणाऱ्या बाउन्सर, यॉर्करवर मुख्यमंत्र्यांनी बेधडक बॅटिंग केली.
देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर, भाजपावर टीका केली होती. विरोधकांकडून राहुल गांधींना पप्पू म्हटलं जातं, याबाबत राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, 'पप्पू आता त्यांच्यासाठी परमपूज्य' झाले असतील, असं राज खोचकपणे म्हणाले होते. घमेंडीच्या विरोधात लोकांनी मारलेली मुसंडी, अशा शब्दांत त्यांनी या निकालाचं वर्णन केलं होतं. या संदर्भात रजत शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना छेडलं. तेव्हा, राज यांना गांभीर्याने न घेण्याची सल्लाच त्यांनी दिला. तीन राज्यांमध्ये पराभव अहंकारामुळे झालेला नाही, आम्ही जमिनीवर होतो आणि आहोत, असंही त्यांनी सांगितलं.