Lokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 07:45 PM2018-12-13T19:45:55+5:302018-12-13T19:57:15+5:30
देशातील लोकांनी आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : देशातील लोकांनी आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. लोकशाही व्यवस्था सक्षम करण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्यांचा लोकमत संसदीय पुरस्काराने सन्मान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुरुवारी दिल्लीतील समारंभात करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बोलत होते.
लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लोकमत परिवाराचे अभिनंदन केले. तसेच, संसदेसाठी शरद पवार यांनी 52 वर्षांचे योगदान दिल्यामुळे त्यांचे कौतुक केले. लोकमत ग्रुपने पुरस्कारांसाठी योग्य खासदारांची निवड केल्यामुळे मी खूप खुश असल्याचेही ते म्हणाले.
सर्वांनी आपल्या मातृभाषेचा आदर राखला पाहिजे. लोकांनी आपापल्या भाषेतच बोललं पाहिजे. मग, ती कोणतीही भाषा असो. मराठी, गुजराती, कन्नड, पंजाबी, काश्मीरी असो प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मांडले. तसेच, ते म्हणाले मातृभाषेनंतर इतर भाषेत बोला. परदेशात जा शिका, परत या पण मातृभाषेत बोला.
दरम्यान, यावेळी लोकमत संसदीय पुरस्कारातील जीवनगौरव पुरस्कार खा. शरद पवार (राज्यसभा) व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी (लोकसभा) यांना प्रदान करण्यात आला. तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील भाजपा सदस्य निशिकांत दुबे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर, संसदेत संस्मरणीय कामकाज करणा-या श्रीमती कणिमोळी, हेमा मालिनी, श्रीमती रमा देवी, छाया वर्मा या महिला खासदारांनाही लोकमत संसदीय पुरस्काराने गौरविण्यात आले.