Lokmat Parliamentary Awards: एका व्यक्तीच्या वैयक्तिक हितांपायी काँग्रेसकडून भारताचं विभाजन- पीयूष गोयल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 10:48 PM2019-12-10T22:48:21+5:302019-12-10T22:54:49+5:30
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका व्यक्तीच्या वैयक्तिक हितापायी काँग्रेसनं धार्मिक आधारावर भारताचं विभाजन करणाऱ्या द्विराष्ट्राच्या सिद्धांताचा स्वीकार केला. पीयूष गोयल यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना लक्ष्य केलं. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात पीयूष गोयल बोलत होते.
1947ला काँग्रेस पक्षानं भारताचं दोन राष्ट्रांत विभाजन केलं. त्यांनी भारताला धर्माच्या आधारावर विभाजित केलं. आमचे बहीण-भाऊ धर्माच्या आधारेच विभक्त झाले. बांगलादेश असो किंवा पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांची संकल्पना कोणी रचली?, एका व्यक्तीच्या स्वार्थापायी काँग्रेसनं भारताचं विभाजन केलं. कारण काँग्रेसमधली ती व्यक्ती पंतप्रधानपदाचा त्याग करू इच्छित नव्हती. त्यामुळे धर्माच्या आधारावर भारताचं विभाजन केलं. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधल्या अल्पसंख्याकांवर कायम अत्याचार होत राहिले. आम्ही हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांना भारतीय नागरिक बनण्याची संधी देत आहोत. तसेच एनसीआरच्या माध्यमातून गोयल यांनी घुसखोरांना बाहेर फेकणार असल्याचंही सांगितलं आहे. तर निर्वासितांना कोणतीही चिंता करण्याचं कारण नसल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.रेल्वेची अवस्था अतिशय बिकट असल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. त्यावरही गोयल यांनी भाष्य केलं. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानं रेल्वेवर 22 हजार कोटींचा बोजा पडला आहे. प्रवाशांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेत केली जाणारी गुंतवणूक दीडपटीनं वाढली आहे. मोफत वायफाय सेवा दिली जात आहे. याशिवाय सुरक्षेवर केला जाणारा खर्चदेखील वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.