Lokmat Parliamentary Awards: शिवसेना गद्दार, युतीचा धर्म पाळला नाही- पीयूष गोयल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 05:30 PM2019-12-10T17:30:50+5:302019-12-10T17:42:57+5:30
Lokmat Parliamentary Awards 2019 : भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही.
नवी दिल्लीः भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं 1990-2000मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत. प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो, असा आरोपही पीयूष गोयल यांनी केला आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावरही भाष्य केलं आहे. आम्ही युती म्हणून लढलेल्या 288पैकी 164 जागा जिंकलो. भाजपानं 105 जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्रात आम्हीयाचा अर्थ आम्ही लढवलेल्या 65 ते 70 टक्के जागा जिंकल्या. पण शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही. जर भाजपानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवल्या असत्या तर आमचं सरकार नक्कीच आलं असतं. शिवसेना शत्रूच्या गोटात जाऊन सामील झाली. शिवसेनेनं सर्वच सिद्धांत मोडीत काढले आहेत. शिवसेना कालपर्यंत ज्यांच्यावर टीका करत होती, त्यांच्यासोबतच जाऊन बसली आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला कोणतीही दूरदृष्टी किंवा ध्येयधोरणं नाहीत. त्यामुळे देशाला या सरकारनं नुकसानच होणार आहे. महाराष्ट्रात भाजपालाच विजय मिळालेला आहे, इतर तिन्ही पक्षांचा पराभव झालेला आहे. शिवसेनेच्या अरविंद सावंतांसाठी मी गल्लीबोळात जाऊन प्रचार केला होता, दक्षिण मुंबईतली जनता शिवसेनेला मतं देऊ इच्छित नव्हती. आम्हाला त्यावेळी माहिती नव्हतं की, हे लोक गद्दारी करतील. शिवसेनेनं आपल्या सिद्धांतांशी फारकत घेत महाराष्ट्रात सरकार बनवलं. आता ते स्वतःला हिंदू सम्राट म्हणायलाही घाबरतात, असंही पीयूष गोयल यांनी अधोरेखित केलं आहे.