Lokmat Parliamentary Awards 2023: "सत्ता कोणाची येणार माहीत आहे", आठवलेंचं विधान अन् गडकरींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 04:54 PM2024-02-06T16:54:21+5:302024-02-06T17:11:26+5:30

Lokmat Parliamentary Awards 2023: 'लोकमत' संसदीय पुरस्कारांचा पाचवा पुरस्कार सोहळा आज दिल्लीत आयोजित करण्यात आला.

 Lokmat Parliamentary Awards 2023 Union Minister Ramdas Athawale said that he knows who will come to power in the future  | Lokmat Parliamentary Awards 2023: "सत्ता कोणाची येणार माहीत आहे", आठवलेंचं विधान अन् गडकरींची प्रतिक्रिया

Lokmat Parliamentary Awards 2023: "सत्ता कोणाची येणार माहीत आहे", आठवलेंचं विधान अन् गडकरींची प्रतिक्रिया

Lokmat Parliamentary Awards 2023: सर्वात विश्वसनीय आणि प्रतिष्ठित 'लोकमत' संसदीय पुरस्कारांचा पाचवा पुरस्कार सोहळा आज दिल्लीत आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. 'लोकमत' संसदीय पुरस्कारासाठी यंदा आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ८ खासदारांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी नवी दिल्लीतील जनपथ रोडवर असलेल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मिश्किल टिप्पणी केली. रामदास आठवले म्हणाले की, पुरस्कार ज्यांना मिळणार आहे, त्या सर्व खासदारांचे अभिनंदन करतो. या आधी आपण कुठेही जात असलो की खूप वेळ लागायचा. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक मंत्री झाल्यापासून सर्वांना लवकर पोहचवण्याचे काम ते करतात. इथे प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित आहेत, आज ते आमच्यासोबत आहेत आधी नव्हते. पण ते कोणासोबत जरी असले तरी माझे चांगले मित्र आहेत.

विनोदी शैलीसाठी ओळखले जाणारे आठवले पुढे म्हणाले की, जेव्हा सत्ता त्यांची होती तेव्हा मी तिथे होतो, आज जेव्हा सत्ता आहे तेव्हा मी इथे आहे. त्यावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितीन गडकरी यांनी मिश्किलपणे म्हटले, "सत्ता कोणाचीही असो तुम्ही सत्तेत असताच." आता सत्ता कोणाची येणार आहे हे मला माहीत आहे. तसेच पूर्वी रस्ते अतिशय खराब होते. पण, लोकांना घरी जाण्यासाठी जास्त वेळ लागू नये म्हणून नितीन गडकरी नवीन रस्ते बांधत आहेत, अशा शब्दांत आठवलेंनी गडकरींचे कौतुक केले.  

दरम्यान, लोकमत संसदीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि लोकसभेचे माजी सरचिटणीस आणि घटनातज्ज्ञ डॉ. सुभाष कश्यप यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरींनी संसदीय पुरस्कारांसाठी राज्यसभा आणि लोकसभेतील प्रत्येकी चार खासदारांची निवड केली. 'लोकमत' संसदीय पुरस्कारांसाठी विजेत्यांची निवड करण्यासाठी ज्युरी मंडळाने लोकसभा तसेच राज्यसभेतील सर्व खासदारांच्या २०२३ या वर्षातील कामगिरीचा अभ्यास केला. 

या कार्यक्रमाला लोकमत मीडिया ग्रुपच्या एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा आणि माजी खासदार अधीर रंजन चौधरी, खासदार भवत्रीहरी महताब, खासदार सी.आर. पाटील, खासदार एन. च्या. प्रेमचंद्रन, खासदार तिरुची सिवा, खासदार डॉ. रजनी पाटील, एबीपी न्यूजचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर आणि लोकमत समूहाचे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता उपस्थित होते.

Web Title:  Lokmat Parliamentary Awards 2023 Union Minister Ramdas Athawale said that he knows who will come to power in the future 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.