लोकसभेची आचारसंहिता ६ ते ८ मार्चला लागू?; मोदी करणार ७० दिवसांत ७० योजनांचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 06:27 AM2018-12-30T06:27:06+5:302018-12-30T06:27:24+5:30
निवडणुका घोषित व्हायला व आचारसंहिता लागू व्हायला आता जेमतेम ७0 दिवस शिल्लक असून, ६ ते ८ मार्चच्या दरम्यान निवडणुकांची अधिकृत घोषणा आयोग करेल, असे दिसत आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यास आता सुरुवात झाली आहे. निवडणुका घोषित व्हायला व आचारसंहिता लागू व्हायला आता जेमतेम ७0 दिवस शिल्लक असून, ६ ते ८ मार्चच्या दरम्यान निवडणुकांची अधिकृत घोषणा आयोग करेल, असे दिसत आहे. त्यामुळे या ७0 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभराचा दौरा करून ७० नव्या योजना व प्रकल्पांची घोषणा करणार आहेत.
रस्तेबांधणीसह सर्व पायाभूत सुविधा योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. ती कामे एक लाख कोटी रुपयांची आहेत.
काँग्रेसवर हल्ला चढवण्यासाठी मोदी अनेक योजनांची उद्घाटने करतील. तसेच ज्या राज्यांत एम्सची कामे सुरू झाली आहेत, त्यांचे उद्घाटन फेब्रुवारीमध्ये मोदी करतील. पुढील ५0 दिवस ते उद्घाटन, पायाभरणी तसेच नव्या योजना व प्रकल्प यांसाठीच देणार आहेत.
नव्या योजना व घोषणा यांसाठी हंगामी अर्थसंकल्पासाठी थांबायलाही मोदी सरकार तयार नाही. संसदेचे हिवाळी अधिवेशन ८ जानेवारी रोजी आटोपताच, तरुणांना रोजगार, एमएसएमई तसेच अन्य योजना जाहीर करण्यात येतील. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३0 जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात होईल.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ७0 दिवसांच्या कामाचा आराखडा तयार केला असून, दर दिवशी एक प्रकल्प वा योजना हा त्याचाच भाग असेल. ‘फिर एक बार, मोदी सरकार’ हे भाजपाचे यंदाचे मिशन आहे. मोदी आज, शनिवारी वाराणसीमध्ये तर उद्या पोर्ट ब्लेअरमध्ये आहेत.
भाजपाध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली व पीयूष गोयल यांनी २0१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाची योजना तयार केली आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही भाजपाची घोषणा निश्चित झाली असली तरी मोदी यांना याहून आकर्षक घोषणा हवी आहे.
पीयूष गोयल यांनी देशाच्या विविध भागांमध्ये तीन संस्थांमार्फत जनमत चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या असून, या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तो सर्व्हे सुरू झाला आहे. त्याचे निष्कर्ष व अहवाल जानेवारीच्या दुसºया आठवड्यात मिळतील.
याआधी आॅगस्टमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाला ३00 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र त्यानंतर लगेचच भाजपाचे बालेकिल्ले म्हणून ओळखल्या जाणाºया उत्तरेकडील तीन राज्यांत पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्या चाचण्यांच्या आधारे नियोजन करण्यात अर्थ नाही, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.
दररोज किमान ४० खासदारांशी चर्चा
अमित शहा यांनी ३५0 लोकसभा मतदारसंघांत काय रणनीती असावी, या दृष्टीने तयारी सुरू केली असून, रोज ते पक्षाच्या किमान ४0 खासदारांशी चर्चा करीत आहेत. बिहार, झारखंड व उत्तर प्रदेशातील खासदारांशी त्यांनी चर्चा पूर्ण केली आहे. तीन राज्यांच्या निकालांनंतर एकाही मतदारसंघात कमी तयारी नसावी, असे त्यांनी ठरविले आहे.