योगींच्या भेटीआधी दलितांना साबण आणि शॅम्पूने आंघोळ घातली, सपाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:35 PM2019-05-15T12:35:31+5:302019-05-15T12:36:24+5:30
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशातील राजकारण तापू लागलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी अलावरपुरच्या जाहीर सभेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
बलिया - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशातील राजकारण तापू लागलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी अलावरपुरच्या जाहीर सभेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्यासाठी गेलेल्या दलितांना अगोदन साबण आणि शॅम्पूने आंघोळ घालण्यात आली होती त्यानंतरच त्यांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली असा गंभीर आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
समाजवादी पक्षाच्या काळात बलिया जिल्ह्याला विकासाशी जोडण्याचं काम केलं. मात्र विद्यमान सरकारने बलियामध्ये होणारा पूर्वांचल एक्सप्रेस हटविण्याचं काम केल. जर याठिकाणी एक्सप्रेस वे बनला असता तर त्यावर विमान उतरवून त्याचा मजबूतपणा दाखवला असता असा दावा अखिलेश यादव यांनी केला.
यावेळी बोलताना अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली केली. अखिलेश यादव म्हणाले की, काही दिवसांपूर्वी याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांनी येथे काय भाषण केले याची कल्पना आम्हाला नाही. मात्र गेल्या 5 वर्षात त्यांनी येथील जनतेला काय दिलं याची उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावीत. मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत जे आश्वासने देतात आणि आश्वासनाविरोधात काम करतात. जर त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलं असेल तर सांगावे. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं वचन दिलं मात्र तेही दिलं नाही. अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं मग कोणासाठी अच्छे दिन आलेत हे सांगा असं त्यांनी सांगितले.
2014 च्या निवडणुकीवेळी चहावाला बनून लोकांपर्यंत आले, 2019 च्या निवडणुकीवेळी चौकीदार बनून आले. मात्र पाच वर्षात काय केलं हे सांगितले नाही. जनतेला चहाचा स्वाद समजला असून चहाची नशा उतरली आहे. आता आम्ही फसणार नाही. युपीतल्या चौकीदारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे यांची चौकीदारी काढून घेण्याचं काम जनतेला करायचं आहे. फक्त पंतप्रधान नाही तर मुख्यमंत्रीही हटविण्याचं काम तुम्हाला करायचं आहे असं आवाहन अखिलेश यादव यांनी लोकांना केले.