भाजपाचा उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरला? या खासदारांचं तिकीट कापणं निश्चित 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 01:28 PM2024-01-12T13:28:03+5:302024-01-12T13:28:28+5:30

Loksabha Election 2024: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तसेच या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्यासाठी भाजपाने खास फॉर्म्युलाही तयार केला आहे.

Loksabha Election 2024: BJP's formula for nomination? The ticket of these MPs is sure to be cut | भाजपाचा उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरला? या खासदारांचं तिकीट कापणं निश्चित 

भाजपाचा उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरला? या खासदारांचं तिकीट कापणं निश्चित 

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तसेच या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्यासाठी भाजपाने खास फॉर्म्युलाही तयार केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून ७० वर्षांवरील खासदारांना तिकीट दिलं जाणार नाही. मात्र यामध्ये काही अपवादही असतील. मिळत असलेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये भाजपा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. इथे भाजपाचे २५ खासदार आहेत. त्यामधील ११ खासदारांचं तिकीट यावेळी कापलं जाण्याची शक्यता आहे. 

अनेक विद्यमान खासदारांनी विविध कारणांवरून निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपलं म्हणणं पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोहोचवलं आहे. माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी जाहीरपणे निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. तर जी. एम. सिद्धेश्वर आणि रमेश जिंगजिगानी हे वाढत्या वयामुळे निवडणूक लढवणार नसल्याचे समोर येत आहे.

तर अनंत हेगडे यांनी आरोग्याबाबतच्या समस्यांचा हवाला दिला आहे. त्याशिवाय शिवकुमार उदासी यांनी निवडणूक न लढवण्यासाठी खासगी कारण समोर केलं आहे. बी. एन. बच्चे गौडा (८२), मंगला अंगाडी, जी. एस. बसवराज, व्ही. श्रीनिवास प्रसाद आणि वाय. देवेंद्रपा हे सुद्धा यावेळी निवडणूक लढवणार नाहीत. तसेच तीन वेळपेक्षा अधिक वेळा जिंकलेल्या नेत्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे भाजपाकडून निश्चित करण्यात आले आहे. मात्र यासाठी काही अपवादही ठेवण्यात येणार आहेत. हाच फॉर्म्युला भाजपाकडून इतर राज्यांमध्येही अवलंबला जाऊ शकतो.

दरम्यान, केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेसुद्धा कर्नाटकमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक लढावी, असा भाजपा नेतृत्वाचा आग्रह आहे. त्यामुळे निर्मला सीतारमन आणि एस. जयशंकर यांच्यासाठी उपयुक्त मतदारसंघाचा शोध घेतला जात आहे. सध्या निर्मला सीतारमन ह्या कर्नाटकमधून आणि एस. जयशंकर हे गुजरातमधून राज्यसभा खासदार आहेत.  

Web Title: Loksabha Election 2024: BJP's formula for nomination? The ticket of these MPs is sure to be cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.