...तर मतदान करून काय करणार?; उदासिनतेवरून तरुणांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 10:11 AM2024-04-27T10:11:33+5:302024-04-27T10:12:52+5:30
बेरोजगारी, शिक्षणाच्या मुद्द्यावर काळजी, भारतात पुन्हा मंदीची ही सुरुवात तर नाही? असे अनेक प्रश्न तरुणांच्या मनात घोळत आहेत जे त्यांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखत आहेत. त
संजय शर्मा
नवी दिल्ली : दुसऱ्या टप्प्यातील मतदानात दोन-तीन राज्ये वगळता मतदानाची टक्केवारी कमी राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे तरुणांमध्ये मतदानाबाबत असलेली उदासीनता. हेच होणार असेल तर, मतदान करून काय करणार? असा विचार तरुण करीत आहेत. कमी मतदानामागे उन्हाळा हे कारण सांगितले जात होते. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यानंतर आणखी एक महत्त्वाची बाब समोर येत आहे ती म्हणजे नवीन मतदार आणि तरुण मतदार मतदानाबाबत पूर्णपणे उदासीन असल्याचे दिसून येत आहे. मतदान केंद्रांवर तरुणांची कमी संख्या चकित करणारी आहे.
पार्थ सेठी या विद्यार्थ्याने एमबीए केले आहे आणि सध्या नोकरी शोधत आहे. प्रिया सचदेवा एक अभियंता आहे, पण तिला काळजी वाटते की, पहिल्यांदाच आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही प्लेसमेंट मिळत नाहीय. भारतात पुन्हा मंदीची ही सुरुवात तर नाही? असे अनेक प्रश्न तरुणांच्या मनात घोळत आहेत जे त्यांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखत आहेत. तरुणांची कमी संख्या सर्वांना खटकत होती.
पाकिस्तानच्या नागरिकांनी पाहिले भारतातील मतदान
पाकिस्तानला लागून असलेल्या एलओसीवर यंदा वेगळीच लगबग दिसली. तेथे भारतातील मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी जनतेचा गोंगाट हाेता. पाकिस्तानी रेंजर्सच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पाकिस्तानी नागरिक पाहत होते.
भाजप उमेदवार तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा दाखल
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ झळकवून त्याद्वारे धर्माच्या आधारावर मते मागितल्याप्रकरणी भाजपचे खासदार आणि बंगळुरू दक्षिणेतील उमेदवार तेजस्वी सूर्या यांच्याविरुद्ध बंगळुरूतील जयनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.