कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 06:07 AM2024-05-07T06:07:04+5:302024-05-07T06:07:20+5:30
बारामती, गांधीनगरकडे देशाचे लक्ष; १७.२४ कोटी मतदार बजावणार हक्क
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभेच्या एकूण सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. राज्यातील ११ जागांसह देशातील ११ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ९३ जागांसाठी १७.२४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना, मागील दोन टप्प्यांच्या तुलनेत यावेळी किती मतदान होईल, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
दुसऱ्या टप्प्यात रद्द झालेली बैतूलची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत आहे, तर सूरतमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने तेथील निवडणूक रद्द करण्यात आली. या टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातेतील सर्व २५ ठिकाणी मतदान होत आहे. त्यापाठोपाठ कर्नाटकमधील १४, महाराष्ट्रातील ११, उत्तर प्रदेशातील १० प्रमुख मतदारसंघात मतदान होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपने जोर लावला असताना, तर त्यांना रोखण्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ने मोर्चेबांधणी केली आहे.
मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न
पहिल्या दोन टप्प्यांत देशात अनुक्रमे ६६.१४ टक्के आणि ६६.७१ टक्के मतदान झाले होते. पुढील पाच टप्प्यांत मतदानाची टक्केवारी आणखी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात आयपीएल सामन्यांदरम्यान जनजागृती करणे, फेसबुककडून युजर्सना अलर्ट पाठविणे, पोस्ट ऑफिस, बँका, रेल्वे, पेट्रोलपंप, चित्रपटगृहात मतदारांना आवाहन केले जात आहे.