"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 03:50 PM2024-05-15T15:50:15+5:302024-05-15T15:55:01+5:30

PM Modi on Muslims : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानपणीचा किस्सा सांगताना मुस्लिम कुटुंबाबद्दल भाष्य केले आहे.

Loksabha Election Eid was celebrated in our house PM Modi told the story of Muslim neighbors | "आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

PM Narendra Modi: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचारामध्ये हिंदू-मुस्लिम, पाकिस्तान हे मुद्दे मोठ्या प्रमाणावर गाजताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील देशभरात निवडणुकांचा धडाका लावला आहे. अशातच पंतप्रधान मोदी यांनी मुस्लिमांसोबत असलेल्या त्यांच्या संबंधाबाबत आणि ग्रोधा प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी माझ्या घराशेजारी मुस्लिम कुटुंबे राहत होती. आम्हीदेखील घरी ईद साजरी करायचो असं म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंदू मुस्लिम चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या लहानपणीचा किस्सा सांगताना मुस्लिमांसोबत असलेल्या कुटुंबांच्या संबंधाबाबत भाष्य केलं. याबाबत स्पष्टीकरण देताना मोदी म्हणाले की, मी केवळ मुस्लिमांबद्दलच बोलत नव्हते तर प्रत्येक गरीब कुटुंबाचा उल्लेख करत होतो. ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लीमबद्दल बोलायला सुरुवात करेल, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनासाठी योग्य ठरणार नाहीत, असेही मोदी म्हणाले.

एका मुलाखतीमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी जास्त मुले असणारी आणि घुसखोरांच्या बाबतीत केलेल्या विधानावर भाष्य केलं. माझ्या आजूबाजूला मुस्लिम कुटुंबे होती. आमच्या घरात देखील ईद साजरी केली जायची. सगळ्या मुस्लिम कुटुंबाकडून माझ्या घरी जेवण यायचं, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

"मला आश्चर्य वाटतंय. तुम्हाला कोणी सांगितले की जेव्हा जास्त मुलं असणाऱ्यांबद्दल बोलतो तेव्हा मुस्लिमांचे नाव घेतो? मुस्लिमांवरच अन्याय का? आमच्या गरीब कुटुंबातही हीच परिस्थिती आहे. तुम्ही कोणत्याही समाजाचे असाल, जिथे गरिबी आहे, तिथे मुले जास्त आहेत. मी हिंदू किंवा मुस्लिम असे म्हटलेले नाही. मी म्हटले की, तुम्ही जितक्या मुलांचे पालनपोषण करु शकता तेवढीच मुले असावीत. अशी परिस्थिती निर्माण करू नका की सरकारला पालन पोषण करावे लागेल," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"माझ्या घराभोवती सर्व मुस्लिम कुटुंबे होती. आमच्या घरीही ईद साजरी व्हायची. इतर सणही साजरे केले जायचे. ईदच्या दिवशी माझ्या घरी जेवण बनायचे नाही. माझ्या घरी सर्व मुस्लिम कुटुंबातून जेवण यायचे. मोहरम सुरू झाला की ताजियाखालून बाहेर पडायचं हा नियम असायचा. मी त्या जगात वाढलो. पण २००२ साली गोध्रा नंतर माझी प्रतिमा खराब झाली," असंही मोदी म्हणाले.

यावेळी मोदींनी एका मुस्लिम महिलेचाही किस्सा सांगितला. "एक मुस्लिम महिला माझ्याकडे आली आणि तिने माझे खूप अभिनंदन केले. तुम्ही जोहापुरीमध्ये केलेले काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे महिलेने सांगितले. कारण तिथले काही लोक वीज चोरून आम्हाला विकायचे आणि त्या बदल्यात त्यांना पैसे द्यावे लागायचे. आता वीज रोज येत असल्याचे महिलेने सांगितले ," असे मोदी म्हणाले.
 

Web Title: Loksabha Election Eid was celebrated in our house PM Modi told the story of Muslim neighbors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.