नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शाह गांधीनगरमधून; भाजपच्या १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातून एकही नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 04:45 AM2024-03-03T04:45:54+5:302024-03-03T04:47:10+5:30
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढील बैठक येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यात लोकसभेच्या अन्य जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित होतील.
सुनील चावके -
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३७० आणि एनडीएला ४०० पार हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपने आज १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा वाराणसीतून, गृहमंत्री अमित शाह गांधीनगरहून, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राजस्थानमधील कोटा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार जाहीर केलेला नाही.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा केली. २९ फेब्रुवारी रोजी झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ही नावे निश्चित करण्यात आली होती. निवडणूक समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह आदींचा समावेश आहे. भाजपचा भौगोलिक क्षेत्र आणि प्रदेशांमध्ये विस्तार व्हावा आणि रालोआतील घटक पक्षांचीही वाढ व्हावी, असे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले. इतर राज्यांतील उमेदवारांची नावे यथावकाश जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख केंद्रीय मंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, भूपेंद्र यादव, मनसुख मांडवीय, सर्बानंद सोनोवाल, किरेन रिजिजू, ज्योतिरादित्य शिंदे, अर्जुनराम मेघवाल, जी. किशन रेड्डी, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, पंकज चौधरी, श्रीपाद नाईक, व्ही. मुरलीधरन, राजीव चंद्रशेखर, गजेंद्रसिंह शेखावत, डॉ. जितेंद्र सिंह आदींचा समावेश आहे.
कृपाशंकर जौनपूरमधून
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप केंद्रात तिसऱ्यांदा बहुमताने सरकार स्थापन करेल. भाजप सर्व राज्यांत आपला विस्तार करण्याचा तसेच सत्ताधारी एनडीए आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- विनोद तावडे, सरचिटणीस, भाजप
मीनाक्षी लेखी, प्रज्ञासिंह यांना वगळले
दिल्लीतील ५ उमेदवारांची घोषणा करताना मीनाक्षी लेखी यांच्या जागेवर बांसुरी स्वराज, चांदनी चौक येथून हर्षवर्धन यांच्या जागी प्रवीण खंडेलवाल, दक्षिण दिल्लीतून रमेश बिधुडी यांच्या जागेवर रामबीर सिंह बिधुडी तर भोपाळ येथे प्रज्ञा सिंह यांच्याजागी आलोक शर्मा यांना उमेदवारी दिली.
३४ केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री
२ माजी मुख्यमंत्री
५७ ओबीसी उमेदवार
४७ पन्नास वर्षांपेक्षा कमी वयाचे
२८ महिला उमेदवार
४७ युवा नेते
२७ अनुसूचित जाती
१८ अनुसूचित जमाती
राज्यनिहाय उमेदवार
उत्तर प्रदेश ५१
मध्य प्रदेश २४
पश्चिम बंगाल २०
गुजरात १५
राजस्थान १५
केरळ १२
तेलंगणा ९
आसाम ११
झारखंड ११
छत्तीसगड ११
दिल्ली ५
जम्मू आणि काश्मीर २
उत्तराखंड ३
अरुणाचल प्रदेश २
गोवा १
त्रिपुरा १
अंदमान-निकोबार १
दमण आणि दीव १
दुसरी यादी?
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पुढील बैठक येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यात लोकसभेच्या अन्य जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित होतील.