लोकसभेची निवडणूक आटोपली, आता व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांचं काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 11:58 AM2019-05-28T11:58:49+5:302019-05-28T11:59:15+5:30
निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मत नोंदवलेल्या चिठ्ठ्यांचे आणि ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या मतांचे काय होणार, अशा प्रश्न अनेकांना पडला आहे.
नवी दिल्ली - सतराव्या लोकसभेची निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा झालेला वापर त्यावर घेण्यात आलेल्या अनेक शंका याच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी शांततेत पार पडली. तसेच संपूर्ण देशभरात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांच्यातील मतांची बेरीज बरोबर जुळल्याने कुठल्याही वादास स्थान राहिले नाही. मात्र आता निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मत नोंदवलेल्या चिठ्ठ्यांचे आणि ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या मतांचे काय होणार, अशा प्रश्न अनेकांना पडला आहे.
यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनसोबतच हजारो व्हीव्हीपॅट मशीनचा वापर देशभरात केला गेला. दरम्यान, मतमोजणी झाल्यानंतर सर्व मत चिठ्ठ्या पुन्हा एकदा व्हीव्हीपॅटमध्ये बंद करण्यात आल्या असून, व्हीव्हीपॅट मशीन सील करण्यात आल्या आहेत. व्हीव्हीपॅटसोबतच सर्व ईव्हीएम मशीनही सीलबंद करण्यात आल्या आहेत. आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांचा नोंदी मतमोजणीपासून पुढच्या 45 दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
व्हीव्हीपॅट मशीनमध्ये नोंद झालेल्या मतचिठ्ठ्यांवरील शाई उडून जाऊ नये म्हणून व्हीव्हीपॅट मशीन अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आतील चिठ्ठ्यांचा हवा आणि प्रकाश यांच्याशी संपर्क येऊ नये म्हणून या मशीन सुरक्षित ठेवण्यापूर्वी प्रत्येक मशीन पॉलिथिनच्या काळ्या पिशवीत बंद करण्यात आली आहे. निकालांबाबत कुणाला शंका असल्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन 45 दिवसांपूर्वी हायकोर्टात अपील करण्याची संधी मिळावी म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. 45 दिवस पूर्ण झाल्यावर निकालांबाबत न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांबाबत निवडणूक आयोग हायकोर्टाकडून माहिती घेईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
या 45 दिवसांत निकालांविरोधात कुणी अपील केल्यास ईव्हीएम आणि व्हीहीपॅट उघडण्यात येतील किंवा सुरक्षित ठेवण्यात येतील. तसे न झाल्यास पुढच्या मतदानासाठी या मशीन तयार करण्याचे काम सुरू करण्यात येईल. एकदा वापर झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीपूर्वी ईव्हीएमची बॅटरी बदलणे आवश्यक असते. कारण फेरफार करता येऊ नयेत म्हणून निवडणूक प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम पूर्णपणे सील केलेले असते. त्यामुळे एकदा वापरलेली बॅटरी पुन्हा वापरल्यास मतदानादरम्यान ईव्हीएममधील बॅटरी संपण्याची शक्यता असते. मात्र व्हीव्हीपॅटबाबत असे होत नाही. व्हीव्हीपॅटमधील बॅटरी मतदानादरम्यान बदलण्याचा पर्यायही उपलब्ध असतो.