लोकसभेपूर्वी सामान्यांना मोठा दिलासा मिळणार; पेट्रोल-डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 09:56 PM2023-12-28T21:56:40+5:302023-12-28T21:57:11+5:30
केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याच्या विचारात आहे.
LokSabha Election Petrol Diesel Price: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी कमी होऊ शकतात. याबाबत सरकार तेल कंपन्यांशी चर्चा करत आहे.
मागील अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर दीर्घकाळापासून कायम आहेत. आता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय चर्चा करत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला वेगवेगळे मसुदे पाठवले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावर केवळ पंतप्रधानांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींबाबत बोलायचे झाले, तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति डॉलर 78.71 रुपयांवर पोहोचली आहे. देशांतर्गत किमती आंतरराष्ट्रीय किमतींवरही अवलंबून असतात.
पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) वेबसाइट iocl.com नुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर दिल्ली ते कोलकाता पर्यंत स्थिर आहेत. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर आहे, तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर आहे.