बिहारमध्ये काँग्रेसला UP सारखा सन्मान मिळाला नाही; अपक्ष खासदारानं RJD ला फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 03:56 PM2024-06-06T15:56:01+5:302024-06-06T16:20:06+5:30
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. त्यात एका अपक्ष खासदारानं नितीन गडकरींचं कौतुक केले आहे.
नवी दिल्ली - केंद्रात जर एनडीए सरकार बनत असेल तर नितीन गडकरी यांच्याशिवाय दुसरा कुणी पंतप्रधानपदासाठी चांगला उमेदवार होऊ शकत नाही असं विधान बिहारच्या पूर्णिया लोकसभा मतदारसंघात अपक्ष खासदार बनलेले राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी केले आहे. पप्पू यादव हे काँग्रेसचे नेते होते, परंतु निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
पप्पू यादव म्हणाले की, पूर्णियामध्ये सर्व माफिया सिस्टमला पप्पू यादव जिंकू नये असं वाटत होते. मी पूर्णियातील लोकांमध्ये राहिलो. लोकांशी संपर्क ठेवला. बिहारमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशासारखा सन्मान मिळाला नाही. यूपीत १७ जागांवर काँग्रेस लढली आणि अखिलेश यादव यांच्यासोबत एका कौटुंबिक नात्याप्रमाणे काम केले. प्रियंका गांधी यांनीही खूप मेहनत घेतली असं त्यांनी सांगितले.
तसेच राहुल गांधींनी बिहारमध्ये ९ जागा घेऊन सर्वकाही दिले. आम्ही आघाडीचा धर्म पाळला होता असं पप्पू यादव यांनी सांगितले. पप्पू यादव यांनी पूर्णिया लोकसभा मतदारसंघात जेडीयूचे उमेदवार संतोष कुशवाह यांना १६ हजार मतांनी हरवले. ६ वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेल्या पप्पू यादव यांना राजदने बाजूला केल्याचा आरोपावर म्हटलं, पप्पू यादवला देवही बाजूला करू शकत नाही. मी कुणाची पर्वा करत नाही. लालू यादव यांच्यासोबत माझे वडिलांसारखे नाते होते असं त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एनडीएसाठी नितीन गडकरीपेक्षा चांगला दुसरा पंतप्रधान असू शकत नाही. या देशाला द्वेष नकोय. देशाला काम करायचं आहे. माझ्या विचारधारेबाबत सर्वांना माहिती आहे असं उत्तर पप्पू यादव यांनी एनडीए की इंडिया कुठल्या आघाडीला पाठिंबा देणार या प्रश्नावर दिले.
केंद्रात बनणार आघाडीचं सरकार
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. भाजपाला सर्वाधिक २४० जागा मिळाल्या असून काँग्रेसला ९९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. अशा परिस्थितीत भाजपा प्रणित एनडीएकडे बहुमतासाठी २९२ जागा आहेत. त्यामुळे देशात एनडीएचं सरकार येणार असं चित्र दिसत आहे. बुधवारी दिल्लीत एनडीएची बैठक पार पाडली. या बैठकीत नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे लवकरच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.