'३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'; एस जयशंकर यांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 11:16 AM2024-05-09T11:16:02+5:302024-05-09T11:20:45+5:30

S Jaishankar : पाकव्याप्त काश्मिरबाबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

Loksabha Election We will also take POK says Foreign Minister S Jaishankar | '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'; एस जयशंकर यांचे मोठं विधान

'३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'; एस जयशंकर यांचे मोठं विधान

S Jaishankar On Pok : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात पाकिस्तानचा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात गाजत आहे. भाजप आणि काँग्रेसकडून सातत्याने पाकिस्तानचा उल्लेख करत एकमेकांवर टीका केली जातेय. दुसरीकडे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मिरबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. पाकव्याप्त काश्मिरबाबत मोदी सरकारच्या वचनबद्धतेबाबत एस जयशंकर यांनी भाष्य केलं.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मिरसंदर्भात पाकिस्तानला कडक इशारा दिला. पीओके भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारतात परत आला पाहिजे. यावर संसदेचा प्रस्ताव आहे आणि सर्व राजकीय पक्ष यासाठी वचनबद्ध आहेत, असे एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी सांगितले की, लोकांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरु असताना मोदी सरकारने भारतीय संविधानातील कलम ३७० कसे रद्द केले.

"लोकांनी हे मान्यच केले होते की कलम ३७० बदलता येणार नाही आणि हे स्वीकारले होते. पण एकदा आपण ते बदलले की संपूर्ण वास्तविकता बदलली. पाकव्याप्त काश्मीरबाबत संसदेत प्रस्ताव आहे. मला एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे, ती म्हणजे 10 वर्षांपूर्वी किंवा 5 वर्षांपूर्वीही लोक आम्हाला या बाबतीत विचारत नव्हते. पण जेव्हा आम्ही ३७० रद्द केले, आता लोकांना समजले आहे की पाकव्याप्त काश्मीर देखील महत्त्वाचे आहे," असं जयशंकर यांनी म्हटलं.

त्याआधी रविवारी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीर कधीही भारताबाहेर जाणार नसल्याचे जाहीर केले होते. ओडिशातील एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर म्हणाले होते,"पाकव्याप्त काश्मीर या देशाच्या बाहेर कधीच नव्हते. तो या देशाचा एक भाग आहे. पाकव्याप्त काश्मीर पूर्णपणे भारताचा भाग असल्याचा संसदेचा ठराव आहे."

"देशात बदल झाला आहे. गेल्या दहा वर्षांत देशाचा स्वतःबद्दलचा विचार बदलला आहे. आमचा दृष्टिकोन जगासमोर ठेवायला आम्ही आता घाबरत नाही. देशाच्या प्रत्येक भागात असलेले वातावरण पाहता एक प्रकारे आपण काळासोबत वाटचाल करत आहोत. भाजपची विचारधारा राष्ट्रवादी आहे. आपण काश्मीर, चीन, अण्वस्त्रे किंवा इतर देशांबद्दल बोललो. आपली मते मांडताना आपण मागेपुढे पाहत नाही, हे भाजपच्या मनात आहे," असंही एस जयशंकर यांनी म्हटलं होतं.
 

Web Title: Loksabha Election We will also take POK says Foreign Minister S Jaishankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.