२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:11 AM2024-05-17T10:11:28+5:302024-05-17T10:13:47+5:30
PM Modi On Press Conference : पत्रकार परिषद न घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
PM Narendra Modi: गेल्या १० वर्षांच्या सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होताना दिसतो. २०१४ पासून मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मौन सोडलं आहे. एक मुलाखतीमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींन पत्रकार परिषद न घेण्याबाबत भाष्य केलं.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी विविध माध्यमांना मुलाखती देत आहेत. मात्र मोदींनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत अशी टीका विरोधकांकडून होत आहे. अशातच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना पत्रकार परिषद न घेण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मोदींनी पत्रकार परिषद न घेण्याचे कारण सांगितले. मी संसदेला उत्तरदायी आहे, असं म्हणत आता लोकांशी संपर्क साधण्याचे इतरही मार्ग उपलब्ध झाले आहेत असं मोदींनी सांगितले.
"काहीही करू नका, फक्त त्यांनाच सांभाळा, तुमचा मुद्दा सांगा मग तो देशभरात जाईल, अशी संस्कृती आता आपल्या माध्यमांमध्ये निर्माण झाली आहे. आतापर्यंत असे होत होते की, माध्यमांच्या प्रतिनिधिंना मॅनेज करून काहीही बोलले तरी ते देशभरात पोहोचत होते, पण मला त्या वाटेने जायचे नाही. मला कष्ट करायचे होते, गरीबांच्या घरापर्यंत मला पोहोचायचे होते. विज्ञान भवनात रिबिन कापल्यानंतर फोटो काढून प्रसिद्धी मिळवू शकलो असतो. पण मी झारखंडमध्ये छोट्याश्या जिल्ह्यात जाऊनही योजनेचे काम करतो. मी एक नवीन कार्यसंस्कृती आणली आहे. माध्यमांना ती संस्कृती योग्य वाटली तर त्यांनी ती मांडावी. ही संस्कृती योग्य नसले तर माध्यमे त्यांना हवं ते करू शकतात," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
"दुसरी गोष्ट म्हणजे मी संसदेला उत्तरदायी आहे. मी तिथे सर्व प्रश्नांचे उत्तरे देण्यासाठी तयार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे प्रसारमाध्यमे आज पूर्वीसारखी राहिली नाहीत. याआधी मी एखाद्या माध्यम संस्थेशी बोलतोय, असेच वाटायचं. पण आता तसे होत नाही. आता त्या माध्यम संस्थेतील कोणत्या पत्रकाराशी बोलतोय, हे लोक पाहतात. ज्या पत्रकाराशी मी बोलतो तो पत्रकार सोशल मीडियावर काय लिहितो, हे लोकांना माहीत असतं. त्यामुळे माध्यमे आता वेगळी राहिलेली नाहीत. पत्रकारांनाही इतरांप्रमाणेच राजकीय भूमिका आहेत हे लोकांना माही पडलं आहे," असेही मोदी म्हणाले.
"पूर्वी माध्यमाचे एकच साधन होते, पण आज अनेक आहेत. पूर्वी तुम्ही मीडियाशिवाय जाऊ शकत नव्हतात. आज संवादाची अनेक माध्यमे आहेत. आज माध्यमांशिवायही जनता आपला आवाज व्यक्त करू शकते. मीडियाशिवाय कोणतीही व्यक्ती त्याचे उत्तर देऊ शकते," असं मोदींनी म्हटलं.