उत्तर प्रदेशात जागावाटपाचं घोडं अडणार? बसपा 40 जागा मागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 02:00 PM2018-06-02T14:00:47+5:302018-06-02T14:00:47+5:30
बसपा सर्वाधिक जागा लढवण्यासाठी आग्रही
लखनऊ: कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनं एकत्र येत भाजपाला धूळ चारली. यामुळे 2019 मधील लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र विरोधकांच्या या एकजुटीला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती 40 लढवण्यासाठी आग्रही असल्यानं विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लागू शकतो. कैराना आणि नुरपूरमध्ये विरोधकांनी भाजपाचा पराभव केल्यावर समाजवादी पक्षानं मोठा जल्लोष केला. मात्र या विजयानंतर मायावतींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मायावती यांचं हे मौन अतिशय सूचक मानलं जातं आहे.
कैराना आणि नुरपूर पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवात मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या दलित मतांचा मोठा वाटा होता. मात्र या विजयानंतरही मायावती शांतच आहेत. बसपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावती यांनी बाळगलेलं मौन हे व्यूहनितीचा भाग आहे. बसपाला लोकसभा निवडणुकीत 80 पैकी 40 जागा हव्या आहेत, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. काही दिवसांपूर्वीच मायावती यांनी निकटवर्तीय कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी याचा उल्लेख केला होता, असंही सूत्रांनी सांगितलं.
गेल्या आठड्यात मायावतींनी लखनऊमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. बसपाला सन्मानजनक जागा मिळाल्या तर ठिक, अन्यथा पक्ष सर्व जागांवर स्वबळावर लढेल, असं मायावतींनी म्हटलं होतं. गोरखपूर, फुलपूर आणि नुरपूरमधील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षानं बसपाच्या सहकार्यानं विजय मिळवला. मात्र तरीही समाजवादी पक्षानं जागावाटपाबद्दल चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. मायावती यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याकडे 'सन्मानजनक जागावाटपा'बद्दल भाष्य केलं होतं. त्यावेळी 'आम्ही सन्मान देण्यात कायमच पुढे असतो. सन्मान कोण देत नाही, हे तुम्हाला माहित आहे', असं उत्तर अखिलेश यांनी दिलं.