मोदींचा चौकीदार विरुद्ध हार्दिक पटेलचं बेरोजगार; सोशल मीडियावर नवं वॉर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 08:45 AM2019-03-19T08:45:46+5:302019-03-19T08:50:08+5:30
मोदी आणि भाजपाच्या कॅम्पेनला हार्दिक पटेल यांचं प्रत्युत्तर
अहमदाबाद: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या चौकीदार चोर है या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला. यानंतर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी, खासदार, आमदार आणि नेत्यांनी नावापुढे चौकीदार शब्द लावला. भाजपाच्या या सोशल मीडिया कॅम्पेनला आता पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे बेरोजगार शब्द जोडला आहे. त्यामुळे आता ट्विटरवर त्यांचं नाव बेरोजगार हार्दिक पटेल असं झालं आहे. ट्विटरवर याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान मोदींनी रविवारी ट्विटरवर स्वत:च्या नावात बदल केला. त्यांनी नरेंद्र मोदी या नावापुढे चौकीदार शब्द लावला. यानंतर भाजपाच्या समर्थकांनी ट्विटर अकाऊंटवर 'मैं भी चौकीदार' लिहिण्यास सुरुवात केली. भाजपा अध्यक्ष अमित शहांसह मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी नावापुढे चौकीदार शब्द लिहिला. भाजपाच्या समर्थकांनीदेखील हा ट्रेंड फॉलो केला. मोदींनी त्यांच्या भाषणात स्वत:ला देश का चौकीदार म्हटलं होतं. त्यानंतर राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करत राहुल यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा दिली. या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून मोदींनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द लावला.
मोदी आणि भाजपाच्या चौकीदार कॅम्पेनला उत्तर देण्यासाठी हार्दिक पटेल यांनी बेरोजगार शब्दाचा वापर केला. देशातील बेरोजगारीचा विषय उपस्थित करण्यासाठी हार्दिक यांनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे बेरोजगार शब्द जोडला. अनेकांनी हार्दिक यांनी नावात केलेल्या बदलाचं समर्थन केलं. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन मोदींनी 2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं.