राजशक्ती विरोधात लोकशक्ती उभारायची आहे,सुरूवात अकोल्यातून; मोदी सरकारवर यशवंत सिन्हा पुन्हा कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 01:53 PM2017-10-15T13:53:29+5:302017-10-15T14:00:30+5:30
सरकारचे नेते आकड्यांचा खेळ करतात आणि मोठे आकडे फेकतात मात्र, आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नाही त्यासाठी जीडीपी हे खरे स्वरूप महत्वाचं आहे.
अकोला - देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन आपल्या लेखातून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. माझ्या लेखानंतर आलेल्या प्रतिक्रिया या देशात काही तरी चुकत आहे या स्पष्ट करणाऱ्या आहेत. आता राजशक्ती विरोधात लोकशक्ती उभारायची गरज आहे आणि त्याची सुरूवात अकोल्यातून करत आहोत असं ते म्हणाले.
अकोल्यात शेतकरी जागर मंचाच्या वतीने यशवंत सिन्हा यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. ‘भारतीय अर्थव्यवस्था, नोटाबंदी, जीएसटी व शेतकरी’, या विषयावर त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या नोटबंदीपासून ते जीएसटीपर्यंत विविध मुद्यांवर टीका केली.
नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. नवीन रोजगार थांबलाय, कर्मचारी कमी केले जात आहेत आणि आम्ही आमच्याच लोकांना भुलवत ठेवत सरकार चालवत आहोत. सरकारचे नेते आकड्यांचा खेळ करतात आणि मोठे आकडे फेकतात मात्र, आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नाही त्यासाठी जीडीपी हे खरे स्वरूप महत्वाचं आहे. जीएसटीमध्ये दिलेल्या सवलती दिशाभूल करणाऱ्या आहेत, मी सरकारला आवाहन करतो या विसंगती दूर करा अन्यथा देशाच्या अर्थ व्यवस्थेला मोठा धोका निर्माण होईल असं ते म्हणाले. जीएसटी म्हणजे गुड अॅंन्ड सिम्पल टॅक्स नाही तर आता एवढा जटील केला आहे की बॅड अॅन्ड काँप्लिकेटेड टॅक्स झाला आहे अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.
यशवंत सिन्हा हे माजी केंद्रीय अर्थमंत्री असल्याने त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेतले जात आहे.