मी असेपर्यंत पक्षात फूट पडू शकत नाही
By admin | Published: September 17, 2016 03:14 AM2016-09-17T03:14:03+5:302016-09-17T03:14:03+5:30
मी असेपर्यंत पक्षात कोणतीही फूट पडू शकत नाही, असे सांगून समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी पक्षात उफाळलेल्या गटबाजीवरील मौन शुक्रवारी येथे सोडले.
मीना कमल, लखनौ
मी असेपर्यंत पक्षात कोणतीही फूट पडू शकत नाही, असे सांगून समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी पक्षात उफाळलेल्या गटबाजीवरील मौन शुक्रवारी येथे सोडले. त्यांचे भाऊ आणि ज्येष्ठ मंत्री शिवपाल यादव यांनी मंत्रीपद व प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुलायम यांनी डॅमेज कंट्रोल मोहिम हाती घेतली आहे आणि त्यांचे राजीनामे फेटाळून लावले. त्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश हे शिवपाल यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्याशी चर्चा केली.
मुलायमसिंग यांच्या मध्यस्थीनंतर समाजवादी पक्षातील वाद संपल्याचे वरवर दिसत असले तरी पुढील आठवडाभरात काय घडना होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या वादांचा निवडणुकांवर परिणाम होईल, असे भाजपाचे नेते छातीठोकपणे सांगत आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे हकालपट्टी झालेले खाणमंत्री गायत्री प्रजापती यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे सूचित करून अखिलेश आपला शब्द मोडणार नाहीत, असा विश्वासही मुलायम यांनी व्यक्त केला. प्रजापतींवरूनच संघर्षाची ठिणगी पडली होती. मुलायमसिंह हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले की, कुटुंब मोठे आहे. सर्वांनी एकोप्याने काम करायला हवे. रामगोपाल, अखिलेश आणि शिवपाल यांच्यात कोणताही संघर्ष नाही. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवपाल यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या.
चार मुद्यांवर समझौता झाला!
1. प्रजापती यांना खाण मंत्रालयाऐवजी दुसरे खाते दिले जावे.
2. शिवपाल यादव यांच्याकडून काढून घेतलेले सगळे विभाग त्यांना परत केले जातील. यात अखिलेश यादव यांचे काढून घेऊन शिवपाल यादव यांना दिलेले पक्षाचे अध्यक्षपद अखिलेश यांच्याकडेच राहील.
3. कोणा मध्यस्थाने आपापसात फूट पाडायचा प्रयत्न केला तर तो त्याला ते स्थान गमवावे लागेल. येथे अमरसिंह यांचे नाव घेऊन चर्चा झाली. त्यावर मुलायम सिंह म्हणाले की,‘‘अशा लोकांना धडा शिकविण्याचे काम मी किंवा तू (अखिलेश) करशील.’’
4. दीपक सिंघल यांना पुन्हा मुख्य सचिवपद आताच दिले जाणार नाही. या विषयावर मुलायम सिंह यादव यांचा कल पाहून अखिलेश यादव यांनी यावर आम्ही नंतर विचार करू असे म्हटले.
आपण नेतांजीसोबत : शिवपाल
पक्षातील पदे आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर समर्थकांना संबोधित करताना सपाचे नेते शिवपाल यादव यांनी आपण सपाप्रमुख मुलायमसिंह यादव यांच्यासोबत असल्याचे सांगितले.
मुलायमसिंह यांनी भाऊ आणि मुलात समेट घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. सात, कालीदास मार्ग येथील निवासस्थानासमोर घोषणाबाजी करणाऱ्या समर्थकांना संबोधित करताना शिवपाल म्हणाले की, आम्हा सर्वांना पक्षाला बळकट करायचे आहे.
आम्ही नेतांजीसोबत (मुलायम) आहोत. त्यांचा संदेश आमच्यासाठी आदेश आहे. शिवपाल यांच्या पत्नी सरला यांनी ईटावा जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून मुलगा आदित्य याने प्रादेशिक सहकार संघाचे अध्यक्षपद सोडले आहे.