काय सांगता? कांदा फक्त 35 रुपये किलो; 'या' ठिकाणी लागल्या लांबच लांब रांग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 09:19 AM2019-11-30T09:19:20+5:302019-11-30T09:31:43+5:30
देशात कांद्याचे दर प्रती किलो शंभर रुपयांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्यांचे 'किचन बजेट' बिघडले आहे.
नवी दिल्ली - देशात कांद्याचे दर प्रती किलो शंभर रुपयांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्यांचे 'किचन बजेट' बिघडले आहे. कांद्याचे भाव वाढल्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मात्र बिहार आणि पाटणामध्ये 35 रुपये प्रती किलो कांदा विकला जात असल्याने तेथील लोकांना दिलासा मिळाला आहे. स्वस्त दरात कांदे घेण्यासाठी सकाळपासूनच लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार आणि पाटणामध्ये कांदे 35 रुपये प्रती किलो या भावाने विकले जात आहेत. बिहारमधील सहकारी संघटना (Biscomaun) ने कांद्याच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा म्हणून स्वस्त दरात कांदा विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. स्वस्त दरात कांदा मिळत असल्याने नागरिकांनीही लांबच लांब रांगा लावल्या आहेत. बिस्कोमानने शहरात ठिकठिकाणी कांद्याची विक्री करण्यासाठी काऊंटर सुरू केले आहेत. एका व्यक्तीला 35 रुपये किलो या दराने फक्त दोन किलो कांदे दिले जात आहेत. हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Patna: Long queues seen to purchase onions from a Bihar State Cooperative Marketing Union Limited (Biscomaun) counter, earlier today. Onions here are being sold at 35/kg pic.twitter.com/mA4NfTVh2u
— ANI (@ANI) November 30, 2019
केंद्र सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमटीसी ही केंद्र सरकारची व्यापारी संस्था कांदा आयात करेल तर नाफेडच्या माध्यमातून भारतातील बाजारपेठांमध्ये त्याचे वितरण होईल अशी घोषणा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र अद्यापही अनेक भागात कांद्याच्या दराने शंभरी गाठलेली आहे. तर काही ठिकाणी कांद्यावरून राजकारण सुरू झाले आहे.
Patna:Onions at Bihar State Cooperative Marketing Union Limited counter being sold at 35/kg. Officials at counters wearing helmets. Rohit Kumar,official says 'there have been instances of stone pelting&stampedes,so this was our only option. No security has been provided to us.' https://t.co/YVjK1rhzKMpic.twitter.com/yoR6OdSfeu
— ANI (@ANI) November 30, 2019
उत्पादन घटल्यामुळे गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर सातत्याने वाढत आहे. राजधानी दिल्लीच कांदा शंभर रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचला असून देशाच्या अन्य भागांमध्ये 80 रुपये प्रती किलोपर्यंत भाव वाढलेले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळेच कांद्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. गुजरात व दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने कांद्याला 6017 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. उपबाजारात 78 वाहनांमधून 1600 क्विंटल कांद्याची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत अनपेक्षित तेजी आली. सध्या गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याला मागणी वाढली आहे. तसेच दक्षिणेकडील राज्यात कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.