जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू तोपर्यंत त्यांच्यासमोर झुकावं लागेल : मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 02:57 PM2021-08-15T14:57:53+5:302021-08-15T15:03:09+5:30
चीनवर अवलंबून राहणं योग्य नसल्याचं मोहन भागवत यांचं वक्तव्य. आपण चीनविरोधात कितीही ओरडलो तरी फोनमधल्या अनेक गोष्टी आहेत ज्या चीनमधूनच येतात : मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी IES राजा शिवाजी शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमत्त झेंडावंदन केलं. यादरम्यान त्यांनी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्यतेबद्दल भाष्य केलं. "आपण इंटरनेटचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो. जे मूळ रूपाने भारतातून येच नाही. आपण कितीही चीनबाबत ओरडलो, तरी आपल्या फोनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या चीनमधूनच येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून राहणं कमी होणार नाही, तोवर चीनसमोर झुकावं लागेल," असं मोहन भागवत म्हणाले.
यापूर्वी मोहन भागवत यांनी सर्वांना संबोधित केलं. "सिकंदरनं आक्रमण करण्यापूर्वीही देशात आक्रमण करणाऱ्यांचा रांगा लागल्या होता. पण आपण त्याला १५ ऑगस्ट रोजी आपण त्याला पूर्णविराम दिला.कोणत्याही परदेशी आक्रमण करणाऱ्याची पावलं आपल्या जमीनीवर पडली तर संघर्ष सुरू होत होता. लढाया लढणारे महापुरूष आपल्याला देतात. त्यांचं आज स्मरण केलं पाहिजे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला आपला देश मिळाला. जो परदेशी लोकांच्या हाती होता तो आपला झाला. आपण आपलं जीवन चालवण्यासाठी मुक्त झालो," असंही त्यांनी नमूद केलं.
"आपल्या आर्थिक दृष्टीचे लक्ष्य म्हणजे सगळ्यांचे सुख. त्याकरिता भौतिक कामनांची तृप्ती आणि सगळ्यांच्या सुखाचे परमलक्ष्य हे प्राप्त करण्यासाठी आपल्यातील समाधान प्राप्त करण्यासाठी बल आवश्यक आहे आणि बल अर्थ साधनातून येते. आत्मनिर्भर बनताना उत्पादनाच्या उत्कृष्टतेवर आपला भर असायला हवा. छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे. जे आपल्या देशात तयार होत नाही, जे अतिआवश्यक आहे तेच आपण निर्यात करायचे आहे. आपल्या अटींवर घ्यायचे आहे. स्वातंत्र्य तर आपल्याला मिळाले पण हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी लोकांना योग्य बनणे आवश्यक आहे. ती योग्यता आपल्याला आपला राष्ट्रध्वज पाहून कळते. शीर्षस्थानी असलेला भगवा रंग जो त्यागाची, कर्माची, प्रकाशाच्या दिशेने नेण्याची प्रेरणा देतो. ते आपले लक्ष्य आहे. आपल्याला जगात अशी मानवता हवी आहे. मनुष्याचे जीवन 'असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय' हे परमलक्ष्याकडे घेऊन जाणाऱ्या एका यात्रेचे वर्णन आहे अशा पद्धतीने चालणारी निरंतर यात्रा आहे, आपल्याला असा समाज बनवायचा आहे, संपूर्ण जगाला असे बनवायचे आहे. त्यासाठी भारताला स्वतंत्र करायचे आहे. हे करतेवेळी आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे कि, आपला हा उद्देश जितका पवित्र, शुद्ध आहे, तितकाच त्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न, आपली वृत्ती तितकीच शुद्ध आणि निर्मळ असावी, शीलता असावी, त्याचे प्रतीक म्हणजे सफेद रंग आहे," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
Maharashtra: RSS chief Mohan Bhagwat hoists the national flag at IES Raja Shivaji School in Mumbai, on #IndependenceDay2021pic.twitter.com/tHnRtQL6Zj
— ANI (@ANI) August 15, 2021
पंतप्रधानांनीही केलं संबोधित
"आज करत असलेले संकल्प देशाच्या १०० व्या स्वातंत्र्य दिनी सिद्ध होतील. त्यावेळी या लाल किल्ल्यावरून जे कुणी पंतप्रधान भाषण करतील. ते आज आपण करत असलेल्या संकल्पांची सिद्धता झाल्याचा उल्लेख करतील. दहशतवाद आणि विस्तारवाद हे भारतासमोरील मोठे आव्हान. भारत या दोन्ही आव्हानांचा प्रभावीपणे सामना करत आहे. देशाच्या लष्कराचे हात बळकट करण्यामध्ये आम्ही कुठलीही कुचराई करणार नाही, असा मी देशाच्या नागरिकांना विश्वास देतो," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना म्हणाले.
"आज देशाजवळ २१व्या शतकातील आवश्यकतांची पूर्तत करण्यासाठी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे. गरीबांची मुले मुली मातृभाषेत शिकून प्रोफेशनल्स बनतील तेव्हा त्यांच्या सामर्थ्यासोबत न्याय होईल. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण गरिबीविरोधातील लढाईचे साधन असल्याचं मला वाटतं. भारत पुढच्या काही काळामध्ये प्रधानमंत्री गति शक्तीचा नॅशनल मास्टर प्लॅन देशासमोर ठेवणार आहे. १०० लाख कोटीपेक्षा अधिकच्या या योजनेच्या माध्यमातून लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हा असा मास्ट्र प्लॅन असेल, जो हॉलिस्टिक इंफ्रास्ट्रक्चरची पायाभरणी करेल," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.