लोंगेवाला युद्धातील हीरो कर्नल धर्मवीर यांचं निधन, त्या लढाईत छोट्याशा तुकडीने उडवला होता पाकिस्तानचा धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 08:47 PM2022-05-17T20:47:07+5:302022-05-17T20:47:17+5:30
Colonel Dharmaveer: भारतीय लष्कराच्या एका छोट्याशा बटालियनने रणगाड्यांसह आलेल्या पाकिस्तानच्या संपूर्ण बटालियनचा लोंगेवालामध्ये पराभव केला होता. या लढाईत शौर्य गाजवणारे कर्नल धर्मवीर यांचं निधन झालं.
नवी दिल्ली - १९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध हे भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील सुवर्णाध्याय आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून बांगलादेश या स्वतंत्र देशाची निर्मिती केली होती. या युद्धात लोंगेवालाची लढाई ऐतिहासिक ठरली होती. येथे भारतीय लष्कराच्या एका छोट्याशा बटालियनने रणगाड्यांसह आलेल्या पाकिस्तानच्या संपूर्ण बटालियनचा पराभव केला होता. या लढाईत शौर्य गाजवणारे कर्नल धर्मवीर यांचं निधन झालं.
त्यावेळी लष्करामध्ये लेफ्टिनेंट म्हणून तैनात असलेल्या धर्मवीर यांच्या नेतृत्वाखाली लष्कराची छोटीसी तुकडी जैसलमेरमधील लोंगेवाला येथे तैनात होती. त्यावेळी रात्री सुमारे १२ वाजता २५०० सैनिक आणि ६५ टँकसह पाकिस्तानच्या लष्कराने या पोस्टवरून दिल्लीला जाण्यासाठी कट रचला. मात्र मेजर कुलदीप सिंह चांदपुरी यांच्या नेतृत्वाखाली भारतील लष्कराची एक तुकडी तैनात होती. त्यामध्ये लेफ्टिनंट धर्मवीर महत्त्वाची भूमिका बजावत होते. मात्र या छोट्याशा तुकडीने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार संरक्षण मंत्रालयाच्या पीआरओंनी सांगितले की, सोमवारी कर्नल धर्मवीर यांचे गुडगांव येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. कर्नल धर्मवीर यांनी १९९२ ते १९९४ पर्यंत २३व्या पंजाब बटालियनचं नेतृत्व केलं होतं.
१९७१ च्या युद्धात झालेल्या लोंगेवाया येथील ऐतिहासिक लढाई निर्णायक ठरली होती. त्या लढाईवर आधारित बॉर्डर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. लोंगेवाला येथील भारतीय लष्कराचे साहस, शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. १९७१ च्या युद्धाला ५० वर्षे झाली आहेत.