नव्या आधुनिक यंत्रणेद्वारे औद्योगिक प्रदूषणावर नजर

By admin | Published: March 7, 2016 10:54 PM2016-03-07T22:54:49+5:302016-03-07T22:54:49+5:30

औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांद्वारे होणाऱ्या हवा व पाणी प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची संयत्रे स्थापित करण्याच्या उपाययोजनेला मोठे यश प्राप्त झाले आहे.

Look at industrial pollution through new modern machinery | नव्या आधुनिक यंत्रणेद्वारे औद्योगिक प्रदूषणावर नजर

नव्या आधुनिक यंत्रणेद्वारे औद्योगिक प्रदूषणावर नजर

Next

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांद्वारे होणाऱ्या हवा व पाणी प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची संयत्रे स्थापित करण्याच्या उपाययोजनेला मोठे यश प्राप्त झाले आहे. हवा आणि पाण्यात नियंत्रित मानकांपेक्षा अधिक प्रदूषण निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये दर १५ मिनिटाला उल्लंघनाचे प्रमाण किती, याचा ग्राफसह अहवाल देणारी यंत्रणा या संयत्रांमुळे कार्यरत झाली आहे.
प्रदूषणावर २४ तास देखरेख ठेवणारी ही आधुनिक संयत्रे कारखान्यांनीच बसवली असून, उद्योग क्षेत्रातल्या बहुतांश कारखान्यांनी स्वयंस्फूर्तीने केंद्र सरकारच्या योजनेला साथ दिली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
योजनेचे तपशील देताना जावडेकर म्हणाले, प्रदूषणात भर घालणाऱ्या कारखान्यांची तपासणी यापूर्वी सरकारच्या निरीक्षकांमार्फत होत असे. ती पद्धत शास्त्रशुद्ध नव्हती आणि हवा आणि पाण्याच्या प्रदूषणात कोणत्या कारखान्याने किती भर घातली, ते सिद्ध करणारा पुरावाही उपलब्ध होत नसे. प्रदूषणात मोठी भर घालणारे कारखाने पर्यावरण मंत्रालयाने शोधून काढले. त्यात सर्वाधिक प्रदूषण पसरवणाऱ्या ३१४५ उद्योगांपैकी, आजमितीला २८२४ उद्योग सुरू आहेत.
आमच्या प्रयत्नांमुळे यातील २२३१ म्हणजे जवळपास ८0 टक्के उद्योगांवर ३१ मार्च २0१६ अखेर प्रदूषणावर नियंत्रण प्रस्थापित करणारी संयंत्रे कार्यरत होत आहेत.
हवेतील पार्टिकल्स, सल्फर डाय आॅक्साईड, नायट्रोजन डाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, तसेच पाण्यात मिसळणारे बायो केमिकल आॅक्सिजन डिमांड (बीओडी) केमिकल आॅक्सिजन डिमांड (सीओडी) टोटल सस्पेंडेड सॉलिड (टीएसएस) अमोनिकल नायट्रोजन इत्यादी १७ प्रकारच्या प्रदूषणाचा शोध लावण्यात, त्यांचे प्रमाण दर्शवण्यात ही संयंत्रे सक्षम आहेत. आजमितीला ११0१ कारखान्यांनी बसवलेल्या संयंत्रांशी पर्यावरण मंत्रालयाचा संपर्क स्थापित झाला आहे.
प्रत्येक कारखान्याने अशी संयंत्रे लवकरात लवकर बसवावीत असे केंद्राचे निर्देश आहेत. त्यातील ५४४ उद्योगांनी त्याचे पालन केले नसून, त्यापैकी १४४ उद्योगांवर सरकारने कारवाई केली आणि प्रदूषण पसरवणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले. नवी संयंत्रे बसवल्याशिवाय आता हे कारखाने सुरू होऊ शकणार नाहीत. याखेरीज ४0३ कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या, असून नियोजित वेळेत सरकारचे निर्देश न पाळल्यास ते कारखानेही बंद केले जातील. त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे, असे जावडेकर म्हणाले.

Web Title: Look at industrial pollution through new modern machinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.