स्किल इंडियाच्या नावे लूट -काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:30 AM2018-09-22T05:30:04+5:302018-09-22T05:30:09+5:30
मोठा गाजावाजा करून पंतप्रधान मोदी यांनी १५ जुलै २०१५ रोजी सुरू केलेल्या ‘स्किल इंडिया’ योजनेत लुटीशिवाय काहीच घडले नाही, असा आरोप करीत काँग्रेसने हा महाघोटाळा असल्याचा दावा केला.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : मोठा गाजावाजा करून पंतप्रधान मोदी यांनी १५ जुलै २०१५ रोजी सुरू केलेल्या ‘स्किल इंडिया’ योजनेत लुटीशिवाय काहीच घडले नाही, असा आरोप करीत काँग्रेसने हा महाघोटाळा असल्याचा दावा केला. ही योजना सुरू होऊन तीन वर्षे उलटली आहेत. आकडेवारीनुसार बनावट नाव-पत्ते देऊन प्रशिक्षणार्थीच्या नावे मिळणारी रक्कम भाजप कार्यकर्ते, दलाल आणि इतर खुलेआम लुटत आहेत.
या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या योजनेत होत असलेल्या लुटीबाबत सर्वत्र चर्चा होत आहे. विविध सर्वेक्षणांनुसार एनएसडीसीने ३४ प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. यापैकी फक्त २० केंद्रे चालू आहेत.
>४० कोटी तरुणांच्या प्रशिक्षणास किती वर्षे?
स्किल इंडिया योजनेतहत ४० कोटी तरुणांना प्रशिक्षित करणार, त्यांना स्वयंरोजगाराची संधी देणार, हे सर्व दावे फोल ठरले आहेत. ४० कोटींपैकी फक्त १.२५ टक्के तरुणांनाच प्रशिक्षित करण्यात आले. या गतीने ४० कोटी तरुणांना प्रशिक्षित करण्यास किती वर्षे लागतील? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी केला आहे.