राष्ट्रीय महामार्गावर कुटुंबाला लुटले, महिला आणि मुलीवर बलात्कार
By admin | Published: July 31, 2016 08:27 AM2016-07-31T08:27:17+5:302016-07-31T08:27:17+5:30
दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर बुलंद शहर येथे शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी एका कुटुंबाला लुटले.
Next
ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ३१ - दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर बुलंद शहर येथे शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी एका कुटुंबाला लुटले. त्यानंतर त्या कुटुंबातील ३५ वर्षीय महिला आणि तिच्या १४ वर्षाच्या मुलीवर दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोएडा सेक्टर ६८ मध्ये रहाणार हे कुटुंब एक नातेवाईकाच्या तेराव्याच्या विधीसाठी शहाजहानपूर येथे चालले होते.
त्यांची गाडी बुलंदशहरातील दोस्तपूर गावाजवळ येताच झाडीमध्ये दबा धरुन बसलेल्या दरोडेखोरांपैकी एकाने गाडीवर लोखंडी सळई फेकून मारली. गाडीच्या चालकाने लगेच ब्रेक मारले व गाडीचे नुकसान पाहण्यासाठी तो खाली उतरला. हीच संधी साधून दरोडेखोर बाहेर आले व त्यांनी संपूर्ण कुटुंबाला बंदुकीच्या धाकावर बंधक बनवले.
ड्रायव्हरला जबरदस्तीने गाडी शेतातून निर्जन ठिकाणी घेऊन जायला भाग पाडले. या दरोडेखोरांनी महिलेवर आणि तिच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या कुटुंबाजवळ असणारे ११ हजार रुपये आणि दागिने लुटून तिथून पोबारा केला. शनिवारी सकाळी या कुटुंबाने जवळचे पोलिस स्टेशन गाठले व घडल्या प्रकाराची तक्रार नोंदवली. उत्तरप्रदेश पोलिसांनी सहा पथके बनवून आरोपींचा शोध सुरु केला आहे.